रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचा निर्धार मेळावा रविवारी रत्नागिरीत माझ्या मतदारसंघात पार पडला. यावेळी खा. विनायक राऊत यांनी माझ्यावर चिडून टीका केली. खा. राऊत यांचा निवडणुकीत पराभव व्हावा, यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांनीही काल व्यासपीठावर निष्ठा व्यक्त केली. आजही आपण शिवसेनेत आहोत. घटकपक्षाच्या तावडीतून शिवसेना वाचवण्यासाठीचा हा उठाव आहे. पण, तो विनायक राऊत यांना मान्य नाही. खा. राऊत यांचा गैरसमज लवकरच दूर होईल, अशी प्रतिक्रिया आ. उदय सामंत यांनी व्यक्त केली.

शहरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात काल सायंकाळी शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वांनी सेनेच्यापाठीशी ठाम उभा राहण्याचा निर्धार केला. काहींनी आपली होणारी गळचेपी आणि भडास या वेळी काढली. खा. विनायक राऊत यांनीही आ. सामंत यांच्यावर जोरदार टीका केली. या मेळाव्यानंतर आ. सामंत यांनी सोशल मीडियावरुन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या मतदारसंघाचा सेनेचा मेळावा रविवारी मी ऐकला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत जी भाषणे झाली ती व्यासपीठावरील पदाधिकार्‍याने मला दाखवली. सर्वांची भाषणे ऐकली. मी त्यांच्या वक्तव्याबद्दल कोणाला दोष देणार नाही. खा. विनायक राऊत यांचे भाषण ऐकले, ते चिडलेले आहेत. आपण त्यांनाही दोष देणार नाही.

एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सहभागी झालो. सेनेला घटकपक्षाच्या तावडीतून सोडवण्यासाठी मी हा निर्णय घेतला. पण राऊत यांना ते मान्य नाही. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली. मी राग मानत नाही. पण, आश्चर्य एवढेच की, जे लोक विनायक राऊत यांचा निवडणुकीत पराभाव व्हावा यासाठी प्रयत्न करत होते, त्यांनीही काल व्यासपीठावर निष्ठा व्यक्त केली. त्यांनाही काही बोलायचं नाही. आजही मी सेनेतच आहे. मला विनंती करायची आहे की, टीकेला मी उत्तर देणार नाही. मला राऊत यांनी अनेकवेळा मदत केली आहे. ते मी कधीच विसरणार नाही. एवढे आश्वासित करतो की, राऊत यांचा गैरसमज काही दिवसात दूर होईल. शिवसैनिकांना त्यांचा एक सहकारी म्हणून मी शुभेच्छा देतो, असे आ. सामंत म्हणाले.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here