चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : प्रसादाच्या पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन एका रिक्षा व्यावसायिकाला अज्ञात प्रवाशांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी चिपळुणातदेखील घडला आहे. रत्नागिरीनंतर हे लोण चिपळुणात आले आहे. अज्ञात चोरट्यांनी रिक्षा व्यावसायिकाला पेढ्यातून गुंगीचे औषध देत त्याचंया गळ्यातील दोन तोळ्याची चेन व 800 रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची माहिती मिळाली आहे. चिपळूण तालुक्यातील कामथे येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सध्या या रिक्षा व्यावसायिकावर उपचार सुरू असून चिपळूण पोलिसांनी तपास सुरू केला आहे. राकेश रवींद्र सकपाळ (रा. वेहेळे, ता. चिपळूण) असे या रिक्षा व्यावसायिकाचे नाव आहे.

राकेश सकपाळ यांनी शनिवारी शहरातील बहाद्दूरशेख नाका येथील रिक्षा स्टॉपला आपली रिक्षा उभी केली होती. दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास दोन प्रवासी तेथे आले. ते हिंदी भाषेत बोलत होते. त्यांनी आपल्याला टेरव येथील मंदिरात जायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार त्या दोन प्रवाशांना रिक्षात बसवून श्री. सकपाळ यांनी कामथेमार्गे टेरव येथे नेले. तेथील देवस्थानचे दर्शन झाल्यानंतर खेर्डीमार्गे दादर येथील मंदिरात पोहोचले. तेथून परतत असताना त्यांनी राकेश सकपाळ यांना प्रसादाचा पेढा दिला. त्या दोघांनीही दुसरी मिठाई स्वतः खाल्ली. काही अंतरावर गेल्यानंतर राकेश याच्या डोळ्यावर अंधारी येवू लागली. तेवढ्यात ते दोघे प्रवासी लघुशंकेकरिता खाली उतरले. त्यानंतर मात्र काय घडले हे राकेश सकपाळ यांनाही सांगता आले नाही. ते बेशुद्ध अवस्थेत रिक्षात पडून होते. मात्र, रात्र झाली तरी राकेश घरी न परतल्यामुळे त्यांच्या भावाने शोधाशोध केली. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास खेर्डी येथे त्यांची उभी असलेली रिक्षा दिसली. त्या रिक्षाच्या मागील सीटवर ते झोपलेल्या अवस्थेत दिसले. त्यांच्या डोळ्यावर धुंदी होती. धड बोलताही येत नव्हते. या प्रकाराने राकेश यांचे नातेवाईक घाबरले. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

पोलिसही तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांना कामथे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पोलिसांना व नातेवाईकांना हकीकत सांगितली. गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन व खिशातील आठशे रुपये चोरीला गेल्याचे सांगितले. त्यांचा जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here