लांजा; पुढारी वृत्तसेवा : जमिनीच्या वादातून दोघा सावत्र मुलांसह सुनेने आईला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील भांबेड लक्ष्मीनगर येथे घडली आहे. या प्रकरणी मुलगे आणि सून अशा तिघांवर लांजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद सावत्र आई स्वाती राजेंद्र मिरजकर (50 वर्षे) यांनी लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. 11 जुलै रोजी राजेंद्र मिरजकर यांचे बारावे विधी होते. याचदिवशी सायंकाळी 5 च्या सुमारास प्रॉपर्टीच्या वादातून सावत्र आई आणि मुले यांच्यात वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. प्रॉपर्टीच्या वाटपाची मिटिंग घेत असताना रोहन मिरजकर याने सावत्र आई स्वाती मिरजकर हिला शिविगाळ करत तिचे डोके भिंतीवर आपटले. यामध्ये स्वाती मिरज ही जखमी झाली. तर याचवेळी सून धनश्री हिने हाताच्या ठोशाने पाठीवर मारहाण करून दुखापत केली. हे भांडण सोडवण्यासाठी स्वाती यांची बहीण कल्पना सचिन शेट्ये (39 वर्षी रा. डोंबिवली) या तिथे आल्या असता रोहन मिरजकर याने त्यांचे केस ओढले तर सून धनश्रीने मारहाण केली. यावेळी उपस्थित गावातील लोक रोहन याला बाजूला घेत असताना त्याने स्टीलचा तांब्या फेकून मारला. यामध्ये रेश्मा शैलेंद्र मलुष्टे (41 वर्षे रा. डोंबिवली) या जखमी झाल्या.

तसेच रुषिकेश मिरजकर, रोहन मिरजकर व धनश्री मिरजकर यांनी दोघा सावत्रभाऊ जय मिरजकर (15 वर्षे) व यश मिरजकर (17 वर्षे) यांना शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली अशी तक्रार स्वाती मिरजकर यांनी पोलिस ठाण्यात केली आहे. मारहाणीत आपल्या गळ्यातील सोन्याची चेनही तुटून पडली असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी सावत्र मुलगे रोहन मिरजकर व ऋषिकेश मिरजकर तसेच सून धनश्री मिरजकर अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव हे करीत आहेत.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here