
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षात मानवी वावर शेती व बागायतीसाठी जंगलात वाढल्याने, प्राणीही मनुष्यवस्तीजवळ येऊ लागले आहेत. विशेषत: बबट्यांकडून खाद्यासाठी पशुधनावरील हल्ले वाढले आहेत.
मागील आर्थिक वर्षात दक्षिण रत्नागिरीतील चार तालुक्यात पशुधनांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या 228 घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. यातील 158 पशुधन मालकांना नुकसानपोटी 17 लाखाहून अधिक रुपयांच्या मदतीचे वाटप झाले आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील चारही तालुक्यात खासगी मालकीच्या जागांवर मोठे जंगल आहे. गेल्या काही वर्षात बागायती व शेतीसाठीही डोंगरातील जंगल तोडीचे प्रकार वाढले आहेत. रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा व राजापूर या चार तालुक्यात बिबट्यांकडून गायी, गुरांसह शेळ्यांवर हल्ला केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
जिल्ह्यात वनक्षेत्र कमी झाल्यामुळे जवळच्या लोकवस्तीजवळ खाद्याच्या शोधार्थ बिबट्याचा वावर आढळत आहे. कुत्रे, मांजरे, गायी-गुरे बिबट्याच्या हल्ल्याचे बळी ठरु लागले आहे. मागील आठवड्यात संगमेश्वर तालुक्यात एका घरात बिबट्या शिरला होता. दोन दिवसांपूर्वी लांजा येथे गोठ्यामध्ये शिरुन वासरु मारल्याचा प्रकार पुढे आला होता. रत्नागिरी तालुक्यातील चाफेनजीक सांबरेवाडी येथेही काही दिवसांपूर्वी बिबट्याचा वावर ग्रामस्थाला दिसून आला. त्याने तत्काळ याची माहिती वनअधिकार्यांना दिली होती. त्यानंतर वनअधिकार्यांनी रात्रीच जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. या भागात सहा कॅमेरेही लावण्यात आले आहेत. वन अधिकार्यांच्या तत्परतेबद्दल ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले होते. रत्नागिरी जिल्ह्यात 2021-22 या आर्थिक वर्षात 228 पशुधनावर बिबट्याने हल्ला केल्याचे प्रकार पुढे आले आहेत. शासनाने शेतकर्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 228 पैकी 158 जणांच्या मालकांना आतापर्यंत मदत वाटप केली. एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंतच्या 158 पशुधनांपोटी 17 लाख 7 हजार 475 रुपयांचे वाटप केले असून 65 पशुधनांपोटीची 5 लाख 70 हजार रुपयांचे वितरण करणे शिल्लक आहेत.पशुंचे हल्ले झालेल्यात संगमेश्वर 16, रत्नागिरी 108, लांजा 20 आणि राजापूरमधील 13 घटनांचा समावेश आहे.
जिल्ह्यात गवे, रानडुकरांचा त्रास खरीपासह रब्बी पिकांना होत आहे. जंगली प्राण्यांमुळे चार तालुक्यातील 76 शेतकर्यांचे नुकसान झाले असून त्यांना मदत म्हणून 46 हजार 399 रुपये वाटप करण्यात आले आहेत. अजुन 10 शेतकर्यांचे 65 हजार 900 रुपये वितरीत करणे शिल्लक असून निधी उपलब्ध झाल्यावर तातडीने त्याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.