
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोरोना कालावधीत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शरीरात प्रोटीनची आवश्यकता आहे. यासाठी तज्ज्ञांकडून मांसाहार करण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, मांसाहार महागल्याने सर्वसामान्यांना प्रोटीनसाठी अन्य घटकांवर अवलंबून राहावे लागत आहे. मटण, चिकन, मासे आणि आता अंड्यांच्या दरातही वाढ झाल्याने खवय्यांचे चांगलेच वांदे झाले आहेत.
उन्हाळ्यात भाज्यांची आवक कमी झाल्याने दर कमालीचे कडाडले होते. आता हे दर कमी होत असताना मांसाहार महागला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मासळीचे दर सर्वसामान्यांना परवडणारे होते. मात्र, 1 जूनपासून खोल समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने मासळीचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे माशांचे दरही चांगलेच कडाडले आहेत. खोल समुद्रातील मासेमारी बंद असल्याने सध्या समुद्रकिनारी भागात आणि खाडीत मासेमारी केली जात आहे. यातून मिळणारा तांबोशी मासा 500 रुपये किलो, बोयर 350 रुपये किलो, कारपा 400 रुपये किलो, रेनवी 500 ते 700 रुपये किलो, कोलंबी 300 ते 500 रुपये किलोने विक्री होत आहे.
माशांबरोबरच मटण आणि चिकनच्या दरातही घसघशीत वाढ झाली आहे. मटण सातशेच्या पुढे पोहोचले आहे. चिकनची 270 रुपये किलोने विक्री होत असून, जिवंत ब्रॉयलर कोंबडीचे दर 160 रुपये आहेत. कलेजी 280 रुपये किलोने विकली जात आहे. गरिबांना परवडणारे अंडेही आता महागले असून, प्रतिनग साडेसहा रुपयांना विकले जात आहे. पावसाळ्यातील बेगमी म्हणून मे महिन्यातच अनेकांकडून सुक्या मच्छिची खरेदी केली जाते. मात्र, यावर्षी सुकी मच्छी उपलब्ध न झाल्याने सुक्या मासळीचा साठाही करता आला नाही. त्यामुळे आता मांसाहार करताना वाढलेले दर पचवणे अवघड बनले आहे.