
रत्नागिरी;पुढारी वृत्तसेवा: गेल्या 2 आडवड्याहून अधिक दिवस सतत पाऊस रत्नागिरीकोसळत आहे, परिणामी यंदा फार मोठे नुकसान जिल्ह्यात झाले नसले तरी प्रशासनाने यावेळी पूर्व खबरदारी घेतल्याने मोठे अनर्थ टळले आहेत. जिल्ह्यात 211 ठिकाणे दरडी प्रवण क्षेत्र असल्याने खेड मध्ये 4 शेल्टर हाऊस तयार करण्यात आले असून या ठिकाणी 155 लोकांना ठेवण्यात आले आहे, तसेच जिल्ह्यातील 850 लोकांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने गतवर्षी पूरस्थितीचा आढावा घेऊन यंदा किमान जीवित हानी होऊ नये, यासाठी आपली सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. हेल्पलाईन क्रमांकासह अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. जेणेकरून संकट काळात नागरिकांना त्वरित मदत पोचावी, हा यामागचा हेतू आहे. त्यामुळ यंदा रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीची दखल स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. गेल्या आठ दिवसांत ज्या घरांना पूर आणि दरड कोसळण्याचा धोका आहे अशा 850 लोकांचे स्थलांतर करण्यात आले तसेच 155 लोकांना खेडमध्ये उभारण्यात आलेल्या 4 शेल्टर हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे.
या लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्थानिक पातळीवर तहसीलदार, ग्रामपंचायत स्तरावर पाठपुरावा केला जातो या सगळ्या घडामोडींवर जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियंत्रण असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिली. जिल्ह्यातील 171 घरांचे अंशतः तर 6 घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यातील 17 पशूंचा मृत्यू झाला यामध्ये 13 पशु एकाच शेतकर्याचे असल्याचेही खांडेकर यांनी सांगितले