
खेड; अनुज जोशी : कोकण रेल्वे मार्गावरील खेड तालुक्यात अंजनी स्टेशन जवळ रेल्वे ट्रॅकवर माती आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गुरुवारी दि १३ रोजी सायंकाळी ३ वाजता ही घटना घडल्याने वाहतूक बंद झाली आहे. कोकणात पावसाची संततधार सुरू असून गुरुवारी दि १३ रोजी पहिल्यांदाच कोकण रेल्वेच्या अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला आहे.
खेड तालुक्यातील अंजनी रेल्वे स्थानकानजीक रुळावर माती व दगड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे खेड रेल्वे स्थानकात मत्स्यगंधा मांडवी एक्स्प्रेस थांबवण्यात आली आहे. गेल्या अर्धातास पेक्षा अधिक काळ प्रवासी खेड स्थानकात अडकून पडले आहेत. रेल्वे रुळावर आलेली माती बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर रेल्वे यंत्रणेकडून सुरू करण्यात आले आहे