
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : सध्या रॉकेलचे वाढते भाव सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. सध्या लिटरला 100 रुपये मोजावे लागत आहेत. यासंदर्भात आ. प्रसाद लाड आणि आ. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा प्रश्न मांडून दर कमी करण्याबाबत मागणी करणार असल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी दिली.
अनिकेत पटवर्धन यांनी सांगितले की, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांच्याकडील संदेशानुसार दि. 1 जुलैपासून दरामध्ये वाढ झाली आहे. मिरज-हजारवाडी डेपोमधून उचल होणार्या घरगुती वापराच्या केरोसीनचे घाऊक विक्री दर 100 पर्यंत पोहोचले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, दापोली तालुक्यात रु. 100. 15 असा दर झाला आहे. खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यात तो रु. 99.40 ते रु. 99.75 एवढा झाला आहे. यासंदर्भात तत्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता असून, सर्वसामान्यांना केरोसीन आवाक्याच्या दरात येणे गरजेचे आहे, अशी मागणी आहे.
याबाबत आ. प्रसाद लाड, आ. रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी उपमुख्यमंत्री नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय मांडूया आणि तोडगा काढूया, असे सांगितले आहे. लवकरच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बैठक होईल, अशी माहिती अनिकेत पटवर्धन यांनी दिली.