
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार,दि. 17 जुलै रोजी चिपळूण येथे होत आहे. सध्या अतिवृष्टी असल्याने ही सभा स्थगित करावी, अशी मागणी काही सभासदांनी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. या बैठकीत चिपळूणची जागा, छपाईचा दिलेला ठेका या विषयांबरोबर अनेक विषयांवर ही सभा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. या सभेकडे जिल्ह्यातील गुरूजींचे लक्ष लागून राहिले आहे.
विद्यमान संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कालावधी 10 मे 2022 रोजी संपलेला होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. ही वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 17 रोजी चिपळूण येथे होणार आहे. संचालक मंडळाची ही सभा शेवटची असणार आहे. सध्या जिल्ह्यात अतिवृष्टी असल्याने ही सभा स्थगित करून पुढे घ्यावी, अशी मागणी काही सदस्यांनी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. या पाच वर्षांच्या कालावधीत अनेक वादग्रस्त विषय झाले आहेत. यावर काहीवेळा सभासदांनी आक्रमक पवित्राही घेतला होता.
चिपळूण येथे 17 गुंठेचा जागा खरेदीचा प्रस्ताव होता. मात्र, प्रत्यक्षात 11 गुंठे जागा वापरात येत आहे. असे असतानाही तसेच हा प्रकार माहिती असूनही 17 गुंठेचा व्यवहार करत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली, अशी चर्चा सभासदांमध्ये असून हा विषय या सभेत वादळी ठरणार आहे. प्रत्येक गुंठ्यामागे 12 ते 13 लाख रुपये गुंतवल्याचेही म्हटले जात आहे. त्याचबरोबर या जागेवर बांधकामासाठी 2 कोटी रुपये ममंजूर असताना 4 कोटी रुपये खर्च केल्याची चर्चाही सुरू आहेे. एकंदरीत हा विषय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
लांजा येथील एक प्रिंटिंग प्रेसला दिलेल्या ठेक्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. पूर्वी या प्रिंटिंग प्रेसचे काम बरोबर नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्या प्रेसला काळ्या यादीत टाकले होते. असे असताना लगेचच त्यांना छपाईसाठी ठेका देण्यात आला. हा विषयही या सभेत येणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर संस्थेची इमारत भाडे न घेताच एका कार्यालयाला वापरायला दिली आहे. हा विषयही वादग्रस्त ठरणार आहे.