
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवात भाविकांच्या सोयीसाठी दि. 28 ऑगस्ट 2022 रोजी मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरुन ‘मोदी एक्स्प्रेस’ धावणार आहे. गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे ना. राणे यांच्या पुढाकाराने मुंबईतून कोकणसाठी ‘मोदी एक्स्प्रेस’ सोडण्यात आली होती.
यंदाही भारतीय जनता पार्टी, मुंबईच्या पुढाकाराने मोदी एक्स्पे्रस ही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. दि. 28 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता सावंतवाडीसाठी सुटणार आहे. भाविकांना घेऊन ही गाडी गाडी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली तसेच सावंतवाडी या स्थानकांवर थांबणार आहे. मोदी एक्स्प्रेसचा खर्च भाजप, मुंबईकडून उचलला जाणार असल्याची माहिती आ. अॅड. मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.
यासाठी मुंबईतील प्रत्येक मंडलामधून कोकणात जाणार्या 50 प्रवाशांची नावे (नाव, वय तसेच मोबाईल क्रमांक या स्वरुपात) मंडल तसेच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांशी चर्चा नोंदवायची आहे. यासाठी नोंदणी प्रत्येकी 100 रुपये शुल्क ठरवण्यात आले असल्याची माहिती देखील मुंबईतील भाजपचे आ. मंगलप्रभात लोढा यांच्याकडून देण्यात आली आहे.