
सावंतवाडी : सावंतवाडी-माठेवाडा येथील जेसन गिलोलीन फर्नांडिस (19) या युवकाने नायट्रोजन गॅसचे श्वसन करुन आत्महत्या केली. नाकातोंडावाटे नायट्रोजन गॅस शरीरात गेल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. या आत्महत्येमागचे कारण उशिरापर्यत समजू शकले नाही. जेसन याने विषारी गॅसच्या सहाय्याने आत्महत्या केल्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली. आत्महत्या करण्यासाठी विषारी वायूचा वापर केल्यामुळे नागरिकांसहित पोलिस ही चक्रावून गेले.
मूळ सावंतवाडी -माठेवाडा येथील जेसन फर्नांडिस हा मुंबई येथे रहात होता. पंधरा दिवसापूर्वी तो सावंतवाडी येथ घरी आला होता. गुरुवारी संध्याकाळी त्याने घरातील बाथरूम मध्ये स्वतःला कोंडून घेत नायट्रोजन या विषारी वायूचे श्वसन करत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने नायट्रोजन सिलेंडर ऑनलाईन पद्धतीने घरी मागविला होता. त्यानंतर त्याने बाहेर बोर्ड लावून ‘डेंजर मी नायट्रोजन गॅस लावला आहे’, त्यामुळे डॉक्टरला सोबत घेऊन मगच आतमध्ये प्रवेश करा, काळजीपूर्वक आत या, गॅस सुरु आहे’ अशा आशयाचा मजकूर लिहिला होता. यानंतर त्याने बाथरूममध्ये स्वतः ला कोंडून घेतले. चेहर्यावर प्लास्टिक पिशवी बांधून गॅसचे दोन्ही पाईप नाकात सोडून पिशवी बाहेरून बांधली व गॅस सुरु केला. हा गॅस नाका तोंडावाटे शरिरात गेल्यामुळे जेसन याचा गुदमरून मृत्यू झाला. शुक्रवारी दुसर्या दिवशी घराच्या बाहेर हा फलक नागरिकांनी पाहिला.
दरम्यान जेसन हा घरातून बाहेर न आल्यामुळे त्याच्या मामाला संशय आला. त्याने दरवाजा ठोठावून जेसनला हाक दिली, मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने फोन केला असता फोन ही उचलला नाही. त्यामुळे त्याच्या मामाने याची खबर स्थानिक नागरिकांना दिली. त्यांनी घरी येऊन पाहणी केली असता व घरासमोरील फलकावर लिहलेल्या मजकूराने ते संभ्रमात पडले. याची खबर पोलिसांना देण्यात आली. पो. निरीक्षक शंकर कोरे व सहा. पो. निरीक्षक सय्यद व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. बाहेरचा फलक पाहून पोलीस ही चक्रवून गेले. त्यांनी डॉक्टरांना पाचारण केले यावेळी मास्क व पीपीई किट घालून खोलीत प्रवेश केला असता बाथरूम मध्ये जेसन मृतावस्थेत खाली बसलेला आढळून आला. त्याच्या जवळ चिठ्ठी सापडून आली. मी निघालो काळजी घ्या, देवा मी तुला भेटायला येतोय, असे लिहिले होते. ही चिट्ठी पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर बाथरूमच्या खिडक्या, छपराची कौले तसेच दरवाजे उघडे करून जमा झालेला गॅस बाहेर सोडण्यात आला. जेसनचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली. ही आत्महत्या गुरुवारी संध्या. 7 ते सकाळी 11 वा केल्याचा अंदाज आहे. जेसन फर्नांडिस हा मुंबई येथे जिम ट्रेनर म्हणून कामास होता. गावी सावंतवाडीत त्याच्या घरी आई व मामा दोघेच असतात त्यामुळे याबाबत घरच्यांची कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.