
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पौर्णिमेमुळे समुद्राला आलेल्या उधाणामुळे किनार्यावर उंच लाटा धडकत आहेत. लाटांच्या या तडाख्यामुळे मिर्या बंधारा अनेक ठिकाणी ढासळत आहे. भरतीच्यावेळी उधानाच्या लाटा नागरिकांच्या परसदारी येत आहे. अनेक ठिकाणी समुद्र किनार्याची वाळू बंधारा उलटून पलिकडे आली आहे.
जाकिमिर्यातील उपळेकर बाग परिसरातील बंधारा ढासळत आहे. या भागात अनेक ठिकाणी मानवी वस्तीत पाणी घुसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यामुणे या भागात पुन्हा समुद्राच्या लाटांचे पाणी थेट मानवी वस्तीत घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या पौर्णिमेमुळे समुद्राला उधाण आले आहे. उधाणामुळे किनार्यावरील घरांना धोका निर्माण होवू शकतो अशी भिती स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.कोकणातील चारही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाल असला तरी दि.19 जुलै पर्यंत मुसळधार पावसासह समुद्र खवळलेला राहणार आहे. उधाणाच्या वेळी समुद्राचा लाटा मोठ्या प्रमाणात किनार्यावर धडकतात. यावेळी लाटा किनार्यावर आदळून पुन्हा समुद्रात जाताना किनार्यावरील बंधार्यांचे दगड आपल्यासोबत घेवून जातात. त्यामुळे किनार्यावरील बंधार्याला अनेक ठिकाणी भगदाड पडत आहे. सध्या जाकिमिर्या नजिकच्या उपळेकर बाग येथील बंधारा वाहून जाऊ लागला आहे. लाटांचा वेग वाढल्यास येत्या दोन-चार दिवसात बंधार्याला मोठे भगदाड पडण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी वर्तवली आहे. पंधरामाड-जाकिमिर्या-भाटिमिर्या संरक्षक बंधार्यासाठी सुमारे 169 कोटी रु. मंजूर करण्यात आले आहे. तत्कालीन सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बंधार्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. या कामाला सुरुवात झाली असून पंधरामाडच्या बाजून टेट्रापॉडस तयार करुन टाकण्याचे काम सुरु झाले आहे.