सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : युतीचा धर्म पाळून पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत यावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. वारंवार आम्ही त्यासाठी पुढाकार घेतला. परंतु, आता वेळ संपत आली आहे. आता ‘मातोश्री’वर परत जाणे आम्हाला शक्य नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली. आ. केसरकर यांनी शनिवारी सावंतवाडी येथे माध्यमांसोबत संवाद साधला.

आ. केसरकर म्हणाले, आज बाळासाहेब ठाकरे असते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवून घेऊन माझ्या वाघाने महाराष्ट्राचं सिंहासन जिंकलं म्हणून त्यांच्या डोक्यावर भगवा टिळा लावला असता. बाळासाहेब ठाकरे हे एक जगावेगळं व्यक्तिमत्व होत. यापुढे मी आयुष्यात कधीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कोणत्याही प्रकारची टीका करणार नाही. शिवाय यापूर्वी शरद पवार यांच्यावर एका शब्दाने जरी टीका केली असेल, तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन, असे मत आ. दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, शरद पवार मला गुरुस्थानी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मी बोलणार नाही. मात्र तसा कोणाचा गैरसमज झाला असेल तर मी कधीही त्यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन माफी मागण्यास तयार आहे. शरद पवार यांच्यावर मी जे बोललो ती राजकीय वस्तुस्थिती होती. मात्र, कोणत्याही पद्धतीने मी त्यांच्यावर टीका केलेली नाही. काही जणांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. तरीही कोणाचे मन दुखावले असेल तर मी माफी मागण्यास तयार आहे.

फडणवीस सुपर सीएम असल्याचा विरोधकांकडून गैरसमज

लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे सुपर सीएम असल्याच्या गोष्टी विरोधकांकडून पसरवल्या जात आहेत. लोकांच्या मनात गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र वस्तुस्थिती अशी नाही. हे सरकार केवळ अडीच वर्षेच नाही, तर पुढची पंचवीस वर्षे महाराष्ट्रात राहील, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here