
रत्नागिरी; भालचंद्र नाचणकर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रणित शिवसेना गटातील रत्नागिरीचे आ. उदय सामंत यांना कोणते मंत्रिपद मिळणार, याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. अशावेळी आ. उदय सामंत यांनीच रत्नागिरीतील कॅरम स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलण्याच्या ओघात अप्रत्यक्षपणे कॅबिनेट उद्योग मंत्रालय मिळण्याचे संकेत दिले आहेत.
आ. उदय सामंत यांनी शुक्रवारी कॅरम स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी कॅरम असोसिएशनच्या काही पदाधिकार्यांनी अशा स्पर्धांना कंपन्या किंवा उद्योगांकडून मदत होत नसल्याची तक्रार केली. या तक्रारीला अनुसरून आ. सामंत यांनी थोडे दिवस थांबा, कंपन्या मदतीसाठी रांग लावतील, असे सांगितले. या विधानावरूनच त्यांना उद्योग मंत्रालाय निश्चित झाले असल्याचा तर्क लावण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शिवसेना गटात सामील झालेल्या आ. उदय सामंत यांचे शुक्रवारी पहाटे रत्नागिरी रेल्वे स्थानकात आगमन झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाली निवासस्थानी 3 जि. प. गटांची बैठक होती. त्यानंतर त्यांचा रत्नागिरी शहरात येण्याचा कार्यक्रम निश्चित नव्हता. तरीही ते सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर आले असता शिवसेनेच्या बहुसंख्य पदाधिकार्यांसह मधुकर घोसाळे, रोशन फाळके, प्रदीप साळवी, रशिदा गोदड या शिवसेनेच्या माजी नगर सेवकांव्यतिरिक्त इतर सर्व नगरसेवकांनी भेट घेतली. रत्नागिरीचे आ. उदय सामंत बंडखोरीनंतर प्रथमच रत्नागिरीत आल्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्यावरून त्यांच्यावर जितकी टीका होईल तितके त्यांचे संघटन मजबूत होणार हे उघड होत आहे. त्यांनी आपल्या कार्यातून मतदारसंघातील विकासकामे आणि वैयक्तिक कामे करून आपल्या प्रभावाची रेषा मोठी करून ठेवली आहे. यापेक्षा जनसंपर्क असलेला नेता जिल्ह्यात नाही.