कुडाळ; प्रमोद म्हाडगुत : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या चौपदरीकरणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहनाचा प्रवास ‘सुसाट’ झाला आहे. मात्र याच चौपदरी महामार्गावर डिव्हायडर तोडून बनवलेले अनधिकृत ‘शॉर्ट कट’ मार्ग वाहनचालक व प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीतील महामार्गाच्या खारेपाटण ते झाराप ( झिरो पॉईंट) पर्यंतच्या टप्प्यात तब्बल 56 ठिकाणी असे जीवघेणे शॉर्टकट मार्ग तयार केले आहेत. जिल्हा परिवहन अधिकार्‍यांनी महामार्गाच्या केलेल्या सर्व्हेक्षण अहवालात ही बाब उघड झाली आहे. मात्र याबाबत नॅशनल हायवे अ‍ॅथॉरेटीचे अधिकारी सुशेगाद असल्याचे चित्र आहे.

पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग म्हणून मुंबई-गोवा महामार्ग ओळखला जातो. कुडाळ मध्य 23 जून 2017 रोजी या महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्या नंतर अनेक अडथळ्याची शर्यत पूर्ण करत सिंधुदुर्ग हद्दीतील 90 कि.मी. महामार्गाचे चौपदरीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग हद्दीत वाहने वाहतुकीचे नियम पायदळी तुडवीत सुसाट धावत आहेत. पण याच सुसाट वाहनांचे जीवघेणे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचे प्रमुख कारण महामार्गवर लेन तोडून तायर केलेले शॉर्टकट असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक हॉटेल व्यवसायिक, वाडी, गावातील ग्रामस्थांनी स्वतःच्या सोईसाठी चौपदरी हायवेचे डिव्हायडर तोडून हे अनधिकृत ‘शॉर्टकट’ तयार केले आहेत. महामार्गच्या जिल्ह्यातील टप्प्यात असे तब्बल 56 जीवघेणे ‘शॉर्टकट’ आहेत.

चुकीच्या कामामुळे नागरिक त्रस्त

सिंधुदुर्ग हद्दीत 90 किलोमीटरमध्ये चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झालं असलं तरी काही ठिकाणी महामार्गाच्या लेनची लेवल, मजबुतीकरण, डांबरीकरण, चुकीचे सर्व्हिस रोड, चुकीच्या ठिकाणी पुलासाठी भराव घातल्याने नागरीकांना पुराच्या पाण्याचा धोका अशा अनेक कारणामुळे वाहनचालक व ग्रामस्थ नागरीक त्रस्त आहेत.

6 महिन्यात 35 अपघात 17 व्यक्तींचा मृत्यू!

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या सिंधुदुर्ग हद्दीत चौपदरी महामार्ग वाहतुकीस खुला झाल्या पासून गेल्या सहा महिन्यात म्हणजेच 1 जानेवारी 2022 ते 30 जून 2022 पर्यंत 35 अपघात झाले असून त्यामध्ये 17 व्यक्तींचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी झाले. 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे यातील 90 टक्के अपघात या अनधिकृत ‘शॉर्टकट’मुळे झाले आहेत. सिंधुदुर्ग वाहतूक पोलिस विभागाची ही आकडेवारी आहे. त्यामुळे हायवे अ‍ॅथॉरिटीने याची गंभीर दखल घेत हायवेची अपूर्ण कामे, आवश्यकत्या ठिकाणी स्पिड लिमीटचे बोर्ड लावून वाहनचालकांच्या सुरक्षितेसाठी वेळीच कार्यवाही करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here