विधवा महिला

रत्नागिरी;  पुढारी वृत्तसेवा :  समाजातील विधवा महिलांवरील अनिष्ट प्रथेला आळा घालण्यासाठी येथील अनुसया महिला स्वयंसेवी संस्थेकडून विधवा शब्द टाळून पूर्णांगिनी हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सामाजिक संस्थेमार्फत असे उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श या संस्थेने समाजासमोर आदर्श ठेवला आहे. तालुक्यातील विविध क्षेत्रांत काम करणार्‍यांना पूर्णांगिनींचा सन्मान तेही एकाच छताखाली ही फार मोठी बाब असल्याचे उद‍्गार जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांचे काढले.

खेडशी येथील अनुसया महिला स्वयंसेवा संस्थेमार्फत विधवांना समाजात प्रत्येक चांगल्या उपक्रमात सन्मान मिळावा. त्यांनाही सर्वसामान्यपणे आयुष्य जगता यावे या हेतूने समाजातील विविध ठिकाणी काम करणार्‍या पूर्णांगिनींना सन्मानाने गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव, न्यायाधीश अमित कुलकर्णी, संस्थेच्या अध्यक्षा नीलम पालव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प समन्वयक घाणेकर, एकात्मिक बालविकास अधिकारी इंगवले, जिल्हा उद्योग प्रकल्प संचालक विद्या कुलकर्णी, संस्थेच्या मनाली साळवी, भडे सरपंच तेंडुलकर आदी उपस्थित होते.

आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित आहेतच. पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुुंकू पुसणे, तिचे सौभाग्य अलंकार काढून घेणे व अन्य कुप्रथा आजही समाजात प्रचलित आहेत. या कुप्रथांचे पालन करणे अनुचित असून, त्याबाबत समाजात व्यापक जनजागृती करण्याच्या हेतूने नुकतेच अनुसया संस्थेमार्फत पूर्णांगिनी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रस्तावनेत साक्षी पालव यांनी सांगितले.

महिलांसाठी वेगवेगळे कायदे आहे. हे कायदे नेमके कोणते आहेत, याचा फायदा पूर्णांगिनींना कसा होईल याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून नेहमीच प्रयत्न होत असतात. त्यामुळे यापुढेही या योजनांविषयी कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यात येईल असे न्यायाधीश अमित कुलकर्णी यांनी सांगितले. नीलम पालव यांनीदेखील अनुसया या संस्थेच्या विविध उपक्रमांमार्फत माहिती दिली. या पूर्णांगिनींना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी संस्था पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन सपना देसाई यांनी
केले.

..अन् पूर्णांगिनींना अश्रू अनावर झाले
याठिकाणी उपस्थित पूर्णांगिनी या विविध संकटांवर मात करून कुटुंब चालवणार्‍या होत्या. या महिलांचा साडी, हळद कुंकू आणि प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. इतकेच नव्हे तर पांढरे कापड लावलेल्या फलकावर हळद कुंकवाने बोटांचे ठसे उमटवण्यात आले. जेणेकरुन त्यांना यापुढे सन्मानाने जगता यावे असा अनुसयाचा हेतू होता. हा सन्मान पाहून उपस्थित पूर्णांगिनींना अश्रू अनावर झाले. या सर्व महिलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्‍त करताना अनुसया संस्थेचे आभार मानले.

The post रत्नागिरी : अनुसयाची ‘पूर्णांगिनी’ संकल्पना प्रेरणादायी appeared first on पुढारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here