
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : गेले तीन दिवस पावसाचा जोर ओसरलेला असून 21 जुलैनंतर पुन्हा कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. गेले तीन दिवस पावसाने संथगतीने वाटचाल सुरू ठेवली आहे. सोमवारी केवळ 18.22 मि.मी.च्या सरासरीने एकूण 164 मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने 21 जुलैपासून पुन्हा पावसाचा जोर कोकणात वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तरीही आगामी तीन दिवस कोकणात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
गेला आठवडाभर कोकणात कमी-अधिक प्रमाणात जोरदार पाऊस झाल्यानंतर आता बहुतांश ठिकाणी पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. कोकणातही पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी, रायगड तसेच महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा आणि विदर्भातील गोंदिया, अकोला आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा अर्थात ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसात पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे.
कोकणात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
बर्याच ठिकाणी शनिवारपासूनच पावसाचा जोर कमी झाला होता. रविवारीही पावसाचा होरा तसाच होता. सोमवारीही पावसाने उसंत घेतल्याने हलक्या सरी कोसळल्या. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. पहिल्या पंधरावड्यात जिल्ह्यात उद्भवलेली पूरस्थिती मात्र ओसरलेली आहे. मात्र प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.