साडवली; पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ वेलोंडेवाडीतील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तुरळ हरेकरवाडी येथील दीपक शांताराम हरेकर (35) या तरुणाला दोन वर्षे सश्रम कारावास व दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा देवरूख न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ब. द. तारे यांनी सोमवारी सुनावली आहे.

तुरळ वेलोंडेवाडीतील महिला घराचा पुढील दरवाजा बंद करून घरातील बाकड्यावर झोपलेली असताना दीपक हरेकर याने वाईट उद्देशाने कौले काढून घरामध्ये येऊन झोपलेल्या महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. ही घटना 24 मार्च 2022 रोजी घडली होती, तर याबाबतची फिर्याद महिलेने संगमेश्वर पोलिस स्थानकात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी महिलेच्या विनयभंगप्रकरणी आरोपी दीपकविरोधात गुन्हा दाखल केला होता.

त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, संगमेश्वरचे पोलिस निरीक्षक उदयकुमार झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार चंद्रकांत कांबळे, पोलिस नाईक सचिन कामेरकर, पो. काँ. बाबूराव खोंदल यांचे तपास पथक तयार करून गुन्ह्याचा तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते.

न्याय दंडाधिकारी श्री. तारे यांनी आरोपी दीपक हरेकर याला 1 वर्ष सश्रम कारावास व 1 हजार 500 रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, तर भा. दं. वि. 452 करिता 1 वर्ष सश्रम कारावास व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील सुप्रिया वनकर यांनी पीडित महिलेच्या वतीने काम पाहिले.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here