
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात 18 मि. मी.च्या सरासरीने 162 मि.मी पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड तालुक्यात 21 मि. मी., दापोली 17, खेड 27, गुहागर 4, चिपळूण 34, संगमेश्वर 7, रत्नागिरी 9, लांजा 25 आणि राजापूर तालुक्यात 18 मि.मी. पावसाची नोंद झाली.जिल्ह्यात आतापर्यंत 1786 मि. मी. सरासरीने 16 हजार मि.मी. एकूण पाऊस झाला आहे. गतवर्षी या कालावधीत पावसाने 2343 मि.मी. सरासरी पाऊस झाला होता. गतवर्षाच्या तुलनेत पाऊस साडे पाचशे मि.मी.ने पिछाडीवर आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने जोर धरला होता. मात्र, गेले तीन दिवस पावसाच्या विश्रांतीमुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे लावणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. पावसाच्या विश्रांतीनंतर दोन ते तीन दिवसांनी पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. सध्या तरी पावसाचा जोर ओसरलेला असल्याने कोकण किनारपट्टीत 22 जुलैपर्यंत ‘ग्रीन अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
अल्पशा विश्रांतीनंतर कोकणात पावसाने पुन्हा जोर धरल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. अतिवृष्टीमुळे व पुराच्या भीतीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 900 नागरिकांचे स्थलांतरही सुरक्षित स्थळी करण्यात आले होते. खेडमधील जगबुडी, चिपळुणातील वाशिष्ठी राजापुरातील कोदवली या नद्यांनी इशारा पातळीने येथे पूरस्थिती निर्माण झाली. मात्र, आता स्थिती नियंत्रणात आहे. तरीही प्रशासनाने खेड आणि राजापूर तालुक्यात खबरदारी घेतली असून आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.