चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तांतरानंतर आगामी न.प.च्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता चिपळुणातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून बुधवारी सकाळी शहरातील सर्व प्रभागांतील नागरिकांना आवाहन करून प्रलंबित समस्या व तक्रारी मांडण्यासाठी आ. शेखर निकम यांच्या कार्यालयात भेटीगाठीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अनुषंगाने आगामी निवडणुकांची चाचपणी चिपळुणातील राष्ट्रवादीकडून सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

राज्यातील बहुतांश नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितींची मुदत सहा महिन्यांपूर्वीच संपली आहे. मात्र, मुदतीत निवडणुका होऊ शकल्या नसल्याने सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया जवळपास वर्षभराचा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यानच्या काळात बहुतांश न.प., जि.प., पं. स.मधून पायउतार झालेल्या लोकप्रतिनिधींपैकी अनेक प्रलंबित विषयांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे काही थोडक्याच लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न झाले. मात्र, सर्वच पक्षांच्या पातळीवर सभागृहातून बाहेर पडल्यानंतर बहुतांश सदस्य अथवा संबंधितांचे पक्षांकडून जनमताच्या विकास प्रश्नांविषयी गेल्या सहा महिन्यात दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत होते.

दरम्यान, राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे आघाडी सरकार कोसळल्यावर नव्या शिंदे सरकारकडून सरपंच व नगराध्यक्ष जनतेतून निवडून आणण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील आघाडीतील घटक पक्षांची सत्ता हातातून गेल्यामुळे किमान स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व रहावे यासाठी आता राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे. प्रामुख्याने चिपळुणात राष्ट्रवादीने न.प.त पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी शहरातील सर्व प्रभागातील नागरिकांना आ. निकम यांच्या कार्यालयात समस्या व अडचणींवर नियोजन करण्यासाठी भेटीगाठीचे आवाहन करण्यात आले. राष्ट्रवादीकडून ही एकप्रकारे निवडणूकपूर्व रंगीत तालीम असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगितले जात आहे.

माजी आ. कदम यांनी चिपळूण न.प.वर सुमारे तीस वर्षे सत्ता वर्चस्व ठेवले. मात्र, त्यांच्या नेतृत्वाखालील मागील सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाच्या अस्तित्त्वाला मोठा धक्का बसला. त्याचबरोबर मित्रपक्ष काँग्रेस बरोबर देखील निवडणूकपूर्व आघाडी करण्यात माजी आ. कदम यांना अपयश आल्याने त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला. तसेच मित्रपक्ष काँग्रेसदेखील मोठ्या प्रमाणात दुखावला गेला. कदम यांच्या नेतृत्वाखाली मागील सार्वत्रिक निवडणूक एकूणच पक्षाला व अस्तित्वाला अनेक वर्षे मागे नेणारी ठरल्याचे पक्षांतर्गत वर्तुळात चर्चिले जाऊ लागले आहे तर सेनेचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात मोठ्या मताधिक्क्याने आ. निकम यांच्या विजयामुळे पक्ष पुन्हा एकदा उभारी घेऊ लागला आहे.

त्याचाच फायदा घेण्यासाठी आ. निकम यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याबाबत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा कल निर्माण झाला आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीची सूत्रे नेमकी कोणाच्या हातात जातात यावर राष्ट्रवादीच्या यशापयशाचे गणित ठरेल असे मतदेखील राष्ट्रवादी वर्तुळातून व्यक्त होत
आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here