गुहागर शहर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात फळलागवडीचे नवनवीन तंत्रज्ञान शेतकरी आत्मसात करताना दिसून येत आहेत. चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने खुर्द येथील एका शेतकर्‍याने इस्राईल तंत्रज्ञान वापरत आपल्या 3 एकर क्षेत्रात फळबाग लागवड केली आहे. यामध्ये 1 हजार केशर आंबा व 500 वेंगुर्ला-7 काजू रोपांची लागवड करुन फळलागवडीचा एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.

कमी जमीन असलेल्या शेतकर्‍यांसाठी उत्पन्नाचे साधन म्हणून इस्राईल तंत्रज्ञानाने फळबाग लागवड केली तर त्याचा हमखास फायदा होतो हे ओळखून मार्गताम्हाने खुर्द येथील देविदास चव्हाण या शेतकर्‍याने फळलागवडीची अनोखी संकल्पना राबविण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार त्यांनी मुलगे शैलेश व सागर चव्हाण यांच्या सहकार्यातून हा प्रयोग यशस्वी केला आहे. पारंपरिक लागवडीमध्ये 1 एकरमध्ये आपण फक्त 40 कलमे लावतो व त्याची फळधारणा होण्यासाठी खूप अवधी लागत होता. परंतु इस्राईल पद्धतीने लागवड केल्यास 1 एकरामध्ये आपण 1200 केसर कलम लावू शकतो व तिसर्‍या वर्षी उत्पन्न सुरु होते. ही लागवड करताना आंबा हा 3 फूट बाय 12 फूट वर लागवड करण्यात येतो. तसेच काजू 6 फूट बाय 14 फूट वर लागवड करण्यात येते. तसेच या बागेमध्ये विविध प्रकारचे आंतरपीकही शेतकरी घेऊ शकतो.

मार्गताम्हाने खुर्द येथील शेतकरी देविदास चव्हाण यांनी पद्मवन अँग्रो फार्मची निर्मिती करुन कोकणात हा नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे. आपल्या 3 एकर क्षेत्रावर ही लागवड केली आहे. केशर आंबा 1 हजार व 500 वेंगुर्ला काजू यांची लागवड केलीच शिवाय जगातील सर्वात महाग असा मियाझाकी आंबा, टाँमी एटकिंग आंबा यांचीसुद्धा लागवड केली आहे. या फार्मच्या माध्यमातून कोकणातील शेतकर्‍यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देण्याचा त्यांचा मानस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here