नांदगाव; पुढारी वृत्तसेवा : नांदगाव-तिठा येथील शेरपुद्दीन मोहम्मद बटवाले (वय 52) हे ओझरम-पियाळी नदीवर मासेमारी करण्यासाठी गेले असता पाय घसरून नदीच्या पाण्यात पडले. पाण्यात बुडत असल्याचे त्यांच्यासोबत असलेले त्यांचे नातेवाईक हनिफ थोडगे यांच्या लक्षात येताच त्यांनी श्री. बटवाले यांना पाण्याबाहेर काढत तत्काळ रिक्षाने नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी 4.30 वा.च्या सुमारास घडली.

नांदगाव तिठा येथून शेरपुद्दीन हे मेहुणीचा पती हनिफ अहमदअली थोडगे (मूळ रा.गगनबावडा, सध्या रा.नांदगाव) यांच्याबरोबर मंगळवारी दुपारी मासेमारीसाठी गळ घेऊन गेले होते. मात्र, ओझरम येथील नदीच्या काठावर पाय घसरून त्यांचा बुडून मृत्यू झाला. बेशुद्ध अवस्थेतच त्यांना पाण्याबाहेर काढत हनिफ थोडगे यांनी उपचारासाठी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी शेरपुद्दीन यांना मृत घोषित केले. शेरपुद्दीन बटवाले यांच्या मृतदेहावर बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.शेरपुद्दीन बटवाले यांचे नांदगाव तिठा येथे गेली अनेक वर्षे चहा,नाष्टाचे हॉटेल आहे.त्याच्या अकाली जाण्याने नांदगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here