
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये बनावट दागिने ठेवून बँकेची सुमारे 22 लाख 80 हजार 500 रुपयांची संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी 5 संशयितांपैकी बँकेच्या रजिस्टर्ड व्हॅल्युअर सोनारासह अन्य तिघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून, एक संशयित फरार आहे. फसवणुकीची ही घटना 21 जानेवारी 2019 ते 23 मार्च 2022 या कालावधीत घडली आहे. संशयितांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.
प्रदीप श्रीपाद सागवेकर (वय 51, रा. कीर्तीनगर, रत्नागिरी), आकाशानी जनार्दन कांबळे (50), शुभम जनार्दन कांबळे (24, दोघेही रा. रवींद्रनगर कारवांचीवाडी, रत्नागिरी), जयवंत सखाराम मयेकर (49, रा. पोमेंडी बुद्रुक मयेकरवाडी, रत्नागिरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत, तर सलीम हुसेन निंबल (रा. कोकणनगर, रत्नागिरी) याचा शोध पोलिस घेत आहेत. त्यांच्याविरोधात गुरुवार दि. 21 जुलै 2022 रोजी शाखा व्यवस्थापक अमिता राजेश झगडे (36, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.
या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्यानुसार प्रदीप सागवेकर हा या बँकेत गेली 18 वर्षांपासून रजिस्टर्ड व्हॅल्युअर सोनार म्हणून काम करत आहे. त्याने सलीम निंबल, आकाशानी कांबळे,शुभम कांबळे, जयवंत मयेकर यांच्याकडील दागिने हे बनावट असल्याचे माहित असूनही ते सोन्याचे असल्याचे सांगून तसे प्रमाणपत्र दिले. त्या आधारे संशयितांनी संगनमताने बँकेतून एकूण 22 लाख 80 हजार 500 रुपयांचे कर्ज घेउन फसवणूक केली होती. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात तक्रार देताच त्यांनी दि. 21 व 22 जुलै रोजी 4 संशयितांना अटक केली.