
सावंतवाडी ः नागेश पाटील गोव्याच्या दिशेने कोळसा वाहतूक करणार्या मालवाहू रेल्वेगाडीचे चार डबे सुटल्यामुळे गोंधळ उडाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 11.45 च्या सुमारास मळगाव रेल्वे स्टेशनवरील सिंगल लाईन रेल्वे ट्रॅकवर घडली. याबाबत माहिती मिळताच मळगाव रेल्वे स्टेशन मास्तर यांच्यासह मेकॅनिकल टीमने धाव घेत हे डबे पुन्हा जोडले. या घटनेमुळे मोठा अनर्थ टळला. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
मळगाव रेल्वे स्थानकादरम्यानची घटना; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
शुक्रवारी नेहमीप्रमाणे कोळसा वाहतूक करणारी मालवाहू रेल्वेगाडी गोव्याच्या दिशेने वाहतूक करीत होती. या गाडीचे सर्व डबे कोळशाने खचाखच भरले होते. मालवाहू गाडी खारेपाटणपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत दाखल झाली असता रेल्वेच्या सिंगल लाईन ट्रॅकवरून वाहतूक करणार्या मालवाहू गाडीचे पाठीमागील चार डबे जॉईंटमधून सुटले व स्टेशनपासून अलीकडे असलेल्या लोखंडी खांबाला धडकले. यावेळी मोठा आवाज झाल्याने रेल्वे अधिकार्यांची एकच धावपळ उडाली. या डब्यांच्या मागे गार्ड केबिनही नव्हती. त्यामुळे डबे जॉईन्टपासून सुटल्याचे उशिरा लक्षात आले.
या दरम्यान प्रसंगवधान राखत मागून येणार्या सर्व रेल्वे गाडयांना तत्काळ सूचना देण्यात आल्या.त्यामुळे या सिंगल लाईन रेल्वे ट्रॅकवर कोणतीही रेल्वे गाडी आली नाही, परिणामी मोठा अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारी 11.45 वा.च्या सुमारास मळगाव रेल्वे स्थानकापासून 15 किमी अंतरावर घडली. या घटनेनंतर मालवाहू गाडी मळगाव रेल्वे स्टेशनवर आणण्यात आली. स्टेशन मास्तर व मॅकनिकल टीमने धाव घेत या चारही डब्याची तातडीने डागडुजी केली. मालवाहू रेल्वे गाडीचे डबे सुटण्याच्या बर्याच घटना घडत आहेत.त्यामुळे पावसाळ्यात विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या.