औरंगाबाद : Aditya Thackerays Shivsamwad Yatra : शिवसेनेचे युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. शिंदे गटात दाखल झालेले आमदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या मतदारसंघात मेळावा घेणार आहेत. त्याआधी आदित्य यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पैठण मतदार संघात आदित्य यांनी रोड शो केला. यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाला. यावेळी ही झालेली गर्दी हेच गद्दार लोकांना उत्तर आहे, असे आदित्य म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रा नाशिक, मनमाड त्यानंतर औरंगाबाद आणि आज पैठण येथे सुरु आहे. त्याआधी आदित्य ठाकरे यांनी मुंबई आणि उपनगरात निष्ठा यात्रा सुरु केले होती. आज ते शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदार संघात आहेत. त्यानंतर गंगापूरला जाऊन तिथे एक मेळावा आदित्य ठाकरे घेणार आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे निश्चितपणे आजही शिवसैनिकांना चांगला प्रतिसाद मिळेल अशी नेत्यांना अपेक्षा आहे. आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले की, मी पक्ष संघटनेची पुनर्बांधणी करण्यास निघालो आहे. राज्यातील आताचे सरकार ‘बेकायदेशीर’ पद्धतीने स्थापन झाल्याने ते लवकरच पडेल, असा दावाही त्यांनी केला.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात तीन दिवसीय शिवसंवाद यात्रेच्या प्रारंभी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार तोंडसुख घेतले. हे सगळे गद्दार आहेत. त्यांना जनताच उत्तर देईल, अशी जोरदार टीका केली.  महाविकास  सरकारने राज्यात विकासकामे केली. पण सध्याच्या सरकारच्या मंत्रिमंडळात दोनच सदस्य आहेत. राज्याला पुराचा सामना करावा लागत आहे, पण या स्थितीत ते (बंडखोर) आम्हाला धमकावू पाहत आहेत. पण आम्ही अशा धमकीकडे लक्ष देणार नाही. मला खात्री आहे की हे सरकार पडेल. ते बेकायदेशीरपणे बनवले गेले आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

बंडखोर आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान त्यांनी दिले. आदित्य ठाकरे म्हणाले, माझे वडील (उद्धव ठाकरे) आजारी असताना शिंदे यांनी बंड केले. त्यांना (बंडखोरांना) राज्य मंत्रिमंडळात संधी दिली, पण त्यांनी फसवणूक करून आम्हाला सोडले. आम्हाला सोडून एकही शिवसैनिक नाही. ते गद्दार आहेत. बघा, ज्या बंडखोर आमदारांना मतदानासाठी बसमधून आणले होते, त्यांना लपवून ठेवले होते, असा हल्लाबोल आधीच्या सभेत त्यांनी केला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here