खेड: पुढारी वृत्तसेवा : दापोली विधानसभा मतदार संघाच्या खेड तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज ( दि.२३) भरणे नाका येथील बिसू हॉटेल येथे ठेवण्यात आली होती. ही बैठक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी बोलावली होती. या बैठकी प्रसंगी शिवसेनेचे सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी- माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत माजी मंत्री रामदास कदम आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ही बैठक सुरू झाल्यानंतर विविध विषय आणि पक्षाशी एकनिष्ठ राहणे यावर जिल्हाप्रमुख कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन सुरू केले. त्यानंतर माजी तालुकाप्रमुख राजा बेलोसे आणि युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी आमदार योगेश कदम आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. त्यामुळे बैठकीत उपस्थित कदम समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्या बैठकीतून माजी तालुकाप्रमुख राजा बेलोसे आणि युवासेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे यांनी पळ काढला.

त्यानंतर शिवसेना तालुका सचिव सचिन धाडवे यांनी आमदार योगेश कदम व शिवसेनेचे रामदास कदम यांच्या समर्थनाचा ठराव करण्याबाबत बोलू लागले. मात्र, त्याबाबत काही न बोलता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी या बैठकीतून काढता पाय घेत बैठक गुंडाळली. परंतु कदम समर्थकांनी अजिंक्य मोरे यांना हॉटेलच्या प्रवेशद्वारावरच गाठून यापुढे माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या विरोधात जर बोलाल, तर आम्ही खपवून घेणार नाही, असा सज्जड दम दिला. त्यामुळे हॉटेल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचलंत का ? 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here