रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी शहरात गाजलेल्या बनावट सोने तारण कर्ज व्यवहार प्रकरणानंतर पुन्हा एकदा दहा-बारा वर्षांनी बनावट सोने तारण कर्ज व्यवहाराचा राष्ट्रीयीकृत बँकेला फटका बसला आहे. बनावट सोने तारण प्रकरणे करून एका सुवर्णकाराने बँक ऑफ इंडियाच्या दोन शाखांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. कारवांचीवाडी पाठोपाठ आता एमआयडीसी शाखेमध्येही जवळपास 49 लाखांहून अधिकचा कर्जव्यवहार केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी दहाजणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी रश्मी दिनेश कुजूर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रदीप सागवेकर हे एमआयडीसी शाखेचे रजिस्टर्ड व्हॅल्युअर आहेत. बनावट दागिन्यांची माहिती असतानाही त्यांनी नऊजणांना सोने तारण करण्यास सहकार्य केले. या प्रकरणी पोलिसांनी 49 लाख 70 हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रदीप श्रीपाद सागवेकर (रा. कोकणनगर , रत्नागिरी), सलीम हुसेन निंबल ( रा. कोकणनगर), आकाशानी जनार्दन कांबळे (रा. कारवांचीवाडी – रत्नागिरी), शुभम जनार्दन कांबळे (रा. कारवांचीवाडी – रत्नागिरी), तेजस्विनी जनार्दन कांबळे (रा. कारवांचीवाडी), जयवंत सखाराम मयेकर ( रा. पोमेंडी- रत्नागिरी), नमिता दिगंबर इंदुलकर (रा. कोकणनगर), संतोष सदाशिव शिंदे (रा . स्वरुपानंदनगर , मजगावरोड – रत्नागिरी), गणेश बाबाजी आंब्रे (रा . कोकणनगर), जबन्ना सिद्धप्पा बिसल ( रा . कीर्तीनगर – रत्नागिरी) या संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये 22 लाख 80 हजाराचे बनावट सोनेतारण कर्ज व्यवहार झाल्याचा प्रकार पुढे आला होता. या प्रकरणी सुवर्णकारासह चारजणांना ताब्यात घेतले असून एकजण फरार झाला होता. कोकण नगर येथील सुवर्णकार प्रदीप सागवेकर याने बँकेच्या एमआयडीसीतील शाखेमध्येही बनावट सोनेतारण व्यवहार केल्याचे पुढे आले आहे. कारवांचीवाडी शाखेतील पाचजणांनी एमआयडीसी शाखेतही व्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. त्याचप्रमाणे अन्य पाचजणांचा समावेश असून एमआयडीसी शाखेत तब्बल नऊजणांनी बनावट सोनेतारण व्यवहार केल्याचे चौकशी निष्पन्न झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here