
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील जनतेसमोर यापुढे शिवसेना म्हणून सामोरे जाऊन या पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केले. उभा महाराष्ट्र शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्वीकारल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर अनंत गीते संघटनेत सक्रिय झाले आहेत. याबाबत गीते म्हणाले की, मी उद्धव ठाकरे यांना रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात दौरा करणार याची कल्पना दिली आहे. शिवसेना संकटात असताना पाठीशी राहणे ही माझी नैतिक जबाबदारी असल्याचे गीते यावेळी म्हणाले. रायगडमधील तीन, रत्नागिरीतील दोघांना धूळ चारण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहन गीते यांनी केले. येणार्या कालावधीत रत्नागिरी, रायगड दोन्हीही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद गटनिहाय मेळाव्यांचे आयोजन करून संघटन अधिक मजबूत केले जाणार असल्याचे गीते यांनी सांगितले. शिंदे गटाची दखल घेण्याची गरज नसल्याचं सांगत गीते यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका केली.
छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी स्वबळावर बंड केलं. राणेंच्या बंडाला काँग्रेसने सहकार्य जरुर केले, पण त्या बंडाचे पुरस्कर्ते काँग्रेस नव्हती. त्या बंडाचं कारस्थान काँग्रेसने रचलेलं नव्हतं. मात्र सध्याचं बंड हे भाजप पुरस्कृत, भाजप रचित हे बंड असल्याची टीका गीते यांनी यावेळी केली.