
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोव्हिड-19 विषाणू प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे वार्षिक कर भरणा करणार्या तसेच नियमात बसणार्या स्कूल बसेसना 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीसाठी करातून 100 टक्के सूट देण्यात आली असल्याची माहिती येथील आरटीओ जयंत चव्हाण यांनी दिली.
शालेय प्राधिकरणाच्या मालकीच्या आणि केवळ स्कूल बस म्हणून वापरण्यात येणार्या स्कूल बसेस, शालेय प्राधिकरणाने कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या तसेच केवळ स्कूल बस म्हणून वापरण्यात येणार्या स्कूल बस, केवळ शाळेतील मुलांची ने -आण करण्यासाठी शालेय प्राधिकरणा व्यतिरिक्त इतरांची मालकी असलेल्या किंवा कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या स्कूल बसेसना करातून सूट देण्यात आली आहे. सूट देण्यासंदर्भातील अधिसूचना 28 जानेवारी 2022 रोजी काढण्यात आली असली तरी काही बदलांमुळे अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. मात्र, आता त्या संदर्भात कार्यवाहीचे आदेश आल्याने स्कूल बसचालकांना दिलासा मिळाला आहे.
या सर्व स्कूल बसधारकांनी लवकरात लवकर सर्व कागदपत्रांसह त्वरित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी येथे संपर्क साधण्याचे आवाहन आरटीओ कार्यालयाकडून करण्यात आले आहे.