आंबोली; पुढारी वृत्तसेवा : गेले काही दिवस आंबोली वर्षा पर्यटनाचा हजारो पर्यटक मनमुराद आनंद घेत आहेत. रविवारी आंबोलीला हजारो पर्यटकांनी भेट दिली असून येथील सर्वच पर्यटनस्थळे गर्दीने फुलून गेली आहेत. त्यामुळे सर्वच पर्यटन स्थळांवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

आंबोली मुख्य धबधबा प्रवाहित झाल्यापासूनच 24 जुलै हा चौथा रविवार आहे. दरम्यान महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आदी राज्यांतील हजारो पर्यटक शनिवारपासूनच आंबोलीत वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले होते. तर रविवारी सकाळपासूनच पर्यटकांची वर्दळ येथे पाहायला मिळाली. आंबोली मुख्य धबधबा, कावळेसाद पॉईंट, नांगरतास धबधबा, बाबा धबधबा, महादेवगड पॉईंट, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र आदी पर्यटनस्थळांवर हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. तर घाटमार्गात वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता पोलिस प्रशासन 50 हून अधिक कर्मचार्‍यांसह सज्ज होते.

मुख्य धबधबा येथे जाणार्‍या पर्यटकांची वाहने चौकुळ रस्ता तसेच आंबोली पोलिस तपासणी नाका परिसरात पार्किंग करुन पुढे घाटमार्गातून चालत पर्यटकांना धबधब्यावर सोडण्यात येत होते. तर रविवारी झालेल्या विक्रमी पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. पर्यटनास मिळणारा प्रतिसाद पाहता पुढील रविवारी आणखी पर्यटक वर्षा पर्यटनास आंबोलीत दाखल होण्याची शक्यता आंबोली टुरिझमकडून वर्तवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here