कणकवली; अजित सावंत : कायद्याचा धाक, जनजागृतीमुळे वन्य प्राण्यांच्या शिकारीत झालेली घट, वृक्षतोडीचे कमी झालेले प्रमाण, परिणामी समृद्ध झालेली जंगले यामुळे सिंधुदुर्गात गेल्या दहा वर्षांत बिबट्यांसह वन्य प्राण्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. बिबट्यांना जंगलात पुरसे अन्न मिळत असले तरी मानवीवस्तीकडे आल्यानंतर सहज मिळणारे कुत्र्यांचे भक्ष्य यामुळे बिबटे मनुष्य वस्तीकडे वळण्याच्या प्रमाणात अलीकडच्या काळात वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांत सातत्याने बिबटे जिल्ह्यात कुठल्या ना कुठल्या गावात, मानवीवस्तीत येऊन कुत्र्यांना भक्ष्य व जनावरांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहेत. अलीकडच्या चार दिवसांत तर जिल्ह्यात दोन ठिकाणी बिबटे भरवस्तीत घुसल्याच्या घटना घडल्या आहेत.

1972 मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा अंमलात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूर्वी होत असलेल्या शिकारींना आणि जंगलतोडीवर निर्बंध आले. गेल्या 52 वर्षांत सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलली. लोकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला. त्यातच जंगले समृद्ध झाल्याने साहजिकच वन्य प्राण्यांची संख्याही वाढली. तृणभक्षक प्राणी जसे वाढले तसे त्यावर अवलंबून असणारे बिबट्यांसारखे हिंस्र प्राणीही वाढले. ज्याप्रमाणे या वन्यप्राण्यांची संख्या वाढली त्याप्रमाणे त्यांच्यात वर्चस्वाची लढाईही वाढली. साहजिकच त्यातील काही वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळू लागले. मानववस्तीकडे आल्यानंतर त्यांना सहजपणे भक्ष्य मिळू लागले. जंगलामध्ये वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेच. जंगालातील वेली आणि पाल्यावर ते जगतात परंतू गावात आल्यानंतर त्यांना पेरु, केळी, नारळ, रतांबे असे खाद्य सहजपणे मिळू लागले. त्यामुळे त्यांचा गावातील वावर वाढू लागला. शहरी भागात तर वानरांना खाद्य दिले जाते. त्यामुळे त्यांना ती सवय लागली. मात्र, हीच सवय नुकसानाची ठरली आहे.

बिबट्यांच्या बाबतीत विचार करावयाचा झाल्यास जिल्ह्यात बिबट्यांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. ज्याप्रमाणे बिबटे वाढले तसे त्यांचे मानवी वस्तीकडे वळण्याचे प्रमाणही वाढले आहे. वस्तीत आल्यानंतर त्यांना गावातील भटके कुत्रे किंवा पाळीव कुत्रे सहजपणे भक्ष्य म्हणून मिळतात. या कुत्र्यांचा पाठलाग करताना दरवर्षी बिबटे विहिरीत पडल्याच्या घटना घडतात. एका वर्षी तर एका गावात कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या एका घराच्या पडवीत घुसला होता. शिवाय बिबट्यांच्या नैसर्गिक अधिवासावर मानवाचे अतिक्रमण झाल्याने त्याचाही परिणाम बिबटे मानवीवस्ती घुसण्यात झाला आहे. पूर्वी गावोगावी पाळीव जनावरे मोठ्या प्रमाणावर जंगलात चरण्यासाठी सोडली जात असत. अलीकडच्या दहा वर्षांत पाळीव जनावरांचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे मानवीवस्तीच्या जवळ चरण्यासाठी सोडलेल्या पाळीव जनावरांवर हल्ले करण्यासाठी बिबटे येवू लागले आहेत. बिबटे माणसांवर सहसा हल्ले करीत नाही. मुळात सायंकाळनंतर रात्री वन्य प्राण्याचा वावर सुरू होतो. मात्र, माणसांचे रात्री उशिरापर्यंत वावरण्याचे प्रमाण वाढले आहे. ते वन्यप्राण्यांच्या संचारात अडथळे आणते. तृण भक्षक प्राणी जसे सांबर, भेकर हेही मानवी वस्तीकडे शेतात येतात. त्यांच्या पाठलागावरही बिबटे येतात. परंतु, त्याला प्रतिबंध करणे हे देखील मानवाच्या हातात आहे. पाळीव कुत्र्यांना घरात ठेवणे, जनावरांना बंदिस्त करून ठेवणे याची काळजी आपण घेतली पाहिजे. वन्य प्राण्यांच्या बाबतीत आपल्यात बदल करण्याची आवश्यक असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे.

सिंधुदुर्गात समृद्ध वनसंपदेमुळे बिबट्यांची संख्या वाढली आहे हे खरे आहे. बिबट्यांना गावात कुत्र्यांचे सहज भक्ष्य मिळते. त्यामुळे ते वारंवार वस्तीकडे वळतात. त्यामुळे त्यांना सहज भक्ष्य मिळू न देणे, जनावरांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. वन्यप्राण्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्यावे. रात्रीचा मानवाचा अनावश्यक वावर कमी करणे आवश्यक आहे.
– सुभाष पुराणिक, वन्यजीव अभ्यासक

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here