रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीला न्यायालयाने सोमवारी तीन वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. १६ मार्च २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास लांजा तालुक्यात ही घटना घडली होती.

अरुण दत्ताराम सुतार (वय 35, रा. शिपोशी ता. लांजा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईने तक्रार दिली होती.

काय आहे घटना?

16 मार्च रोजी नेहमीप्रमाणे पिडीत विद्यार्थीनी बसमध्ये बसून शाळेत जाण्यासाठी सालपे येथे उतरली. बसमध्ये तिच्या हाताला ग्रीस लागले होते. ते काढण्यासाठी पायवाटेत दप्तरातील पाण्याची बाटली काढून हात धुवत होती. तेव्हा आरोपी अरुण सुतारने तिथे येऊन वाईट हेतूने तिचा हात धरला आणि पायवाटेवरील झाडीत ओढू लागला. काटेरी झाडांमुळे तिला दुखापतही झाली. तीने आरडा-ओरडा केला. तेव्हा पाय वाटेने ये-जा करणार्‍या वाटसरुंना पाहून अरुणने सालपे बस स्टॉपच्या दिशेने पळ काढला. घडलेल्या या सर्व प्रकाराची पिडीत मुलीने सायंकाळी घरी गेल्यावर आई-वडिलांना माहिती दिली. त्यानंतर आईने लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

संशयित आरोपीवर गुन्हा दाखल

तक्रारीवरून पोलिसांनी भादंवी कलम 354 व पोस्को 7 व 8 अंतर्गत संशयितावर गुन्हा दाखल केला होता. याबाबत पोलिस उपनिरीक्षक श्वेता पाटील तपास करत होत्या. तपासात पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला गेले वर्षभर सुरु होता. सोमवारी या खटल्याचा निकाल विशेष पोस्को न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. अनुपमा ठाकूर यांनी 9 साक्षिदार तपासत केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी आरोपीला तीन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.पैरवी अधिकारी म्हणून लांजा पोलिस ठाण्याचे पोलीस ठाण्याचे नरेश कदम यांनी काम पाहिले.

हेही वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here