
चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : चिपळुणात दोन दिवस बॅनरचा वाद चांगलाच रंगला. सुरुवातीला शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी लावलेला बॅनर शिवसैनिकांनी काढला. मात्र, त्यांच्या रोषाला न जुमानता पुन्हा दुसर्या दिवशी हा बॅनर लावण्यात आला आणि सायंकाळी मात्र तो ज्यांनी लावला त्यांनीच काढला. हे नाट्य रंगले असताना शहरातील शिवसैनिकांमधील संभ्रम दूर कोण करणार, असा सवाल अजूनही उपस्थित होत आहे.
सेनेचे चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी न.प.समोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बॅनरबाजी केली. सुमारे दीडशे कार्यकर्त्यांचे फोटो या बरोबरच शिवसेना नेत्यांचे फोटो, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फाटो असे सर्व एकाच बॅनरवर झळकले. सध्याच्या राजकीय परिस्थितीत सेनेमध्ये उभी फूट पडली असताना किंवा शिंदे आणि उद्धव गटामध्ये परस्परविरोधी टीका होत असताना सर्वचजण एका बॅनरवर आल्याने हा बॅनर चांगलाच चर्चेत आला. मात्र, दोन दिवसानंतरही या बाबत शहरातील शिवसैनिकांना अद्याप उत्तर मिळालेले नाही. विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी, संभ्रम का निर्माण करता? काही असेल तर उघड सांगा, असे पत्रकार परिषदेद्वारे जाहीर आवाहन केले. दुसर्या बाजूला जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी, कोणी कोणालाही अडविलेले नाही, अशा शब्दांत या बॅनरबाजीचा समाचार घेतला. परंतु नागरिक व शहरातील शिवसैनिकांमध्ये अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे.
या प्रमाणेच या पार्श्वभूमीवर शहर शिवसेनेची उमेश सकपाळ यांनी त्यांच्याच कार्यालयात बैठक घेत शक्तीप्रदर्शन केले. आपल्याकडील ‘टीम’ त्यांनी या निमित्ताने प्रसिद्धी माध्यमांसमोर आणली. त्यामुळे या संभ्रमात अधिकच भर पडली आहे. यावेळी त्यांनी सध्यातरी आपल्या मनात अशा कोणत्याच भावना नव्हत्या. केवळ कृतज्ञता व्यक्त करावी हाच हेतू होता. असे सांगितले असले तरी नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे.
या नाट्यामध्ये नेमके कोण आहे? फक्त एकनाथ शिंदेंची बॅनरबाजी का करण्यात आली? ती करताना वैयक्तिक स्वरूपात का करण्यात आली नाही? असे अनेक सवाल आजही नागरिक विचारत आहेत. मात्र, शिवसेना संघटनेकडून त्याला अद्याप ठोस उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे संभ्रम कायमच आहे. एकीकडे राज्यात शिंदे गट विरुद्ध उद्धव गट यांच्यात टोकाचा संघर्ष निर्माण झाला असताना चिपळुणातील बॅनर मात्र गटबाजीची ठिणगी ठरते की पेल्यातील वादळ ठरते हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. आगामी पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेची शिवसेनेला दखल घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी या घटनेकडे कोणत्या नजरेने पाहतात या बाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.