
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांची संख्या कमी असतानाच भूलतज्ज्ञ वेळीच उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या शस्त्रक्रिया थांबवण्याची वेळ रुग्णालयावर आली आहे. ऑपरेशनसाठी डॉक्टर असतानाही सोमवारी सिझेरियनसाठी आलेल्या एका महिलेला ऑपरेशन कक्षातच ताटकळत थांबावे लागल्याचा प्रकार पुढे आला. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी जिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञ आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आता होऊ लागली आहेत.
रत्नागिरीच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात कायमस्वरुपी भुलतज्ज्ञाचा विषय कायम चर्चेत राहिला आहे. प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञांची आवश्यकता असते. जिल्हा रुग्णालयात जिल्ह्याभरातून प्रसुतीसाठी महिला दाखल होत असतात. अनेकवेळा कोणत्याहीक्षणी त्यांना सिझरसाठी घ्यावे लागते. त्यामुळे येथे 24 तास भूलतज्ज्ञ उपलब्ध असण्याची आवश्यकता आहे. मात्र जिल्हा रुग्णालयात केवळ एकच भूलतज्ज्ञ उपलब्ध आहे. त्यामुळे काही वेळा चिपळूण येथील रुग्णालयातून भूलतज्ज्ञ बोलावून घेतला जातो. मात्र, नियमित होणार्या सिझर व अन्य शस्त्रक्रिया पहाता भुलतज्ज्ञांना वेळ अपुरा पडत आहे.
काही वर्षांपूर्वी रत्नागिरी शहरातील खासगी भूलतज्ज्ञांना शस्त्रक्रियेसाठी तात्पुत्या स्वरुपात निमंत्रित केले जात होते. प्रत्येक शस्त्रक्रियेचा मोबदला त्यांना दिला जात होता. मात्र आता खासगी भुलतज्ज्ञांनी जिल्हा रुग्णालयाकडे पूर्णत: पाठ फिरवली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणूनही हे खासगी भूलतज्ज्ञ शासकीय रुग्णालयाला वेळ देत नसल्याची खंत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी व्यक्त केली. उलट अनेकदा खासगी रुग्णालयात प्रसुतीसाठी नाव नोंदवणार्या अनेक महिलांना शनिवार व रविवारी संबंधित डॉक्टर नसल्याने जिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागत असल्याच्या घटना घडत आहेत.
सोमवारी रुग्णालयात दाखल झालेलेल्या एका महिलेला सिझेरियनसाठी भूलतज्ज्ञ नसल्याने थांबून रहावे लागल्याचा प्रकार घडला. यासाठी ऑपरेशन करणार्या डॉक्टरांना वारंवार वरिष्ठांना फोन करावे लागत होते. सिझरसाठी अशी परिस्थिती असल्याने अन्य ऑपरेशनसाठीही अनेक वेळा रुग्णांना थांबावे लागत आहे. अगदीच इमर्जन्सी असेल तर कोल्हापूरला रुग्णाला पाठवण्याची वेळ रुग्णालयावर येत आहे.
जिल्हा रुग्णालयात नियमित सिझरसाठी महिला येत असतात, त्यामुळे भूलतज्ज्ञांकडून त्यांना प्राधान्य देण्यात येते. यासाठी 24 तास एका भूलतज्ज्ञाला कार्यरत ठेवावे लागते. अन्य शस्त्रक्रियेंसाठी तारीख ठरवून दिल्या जातात. परंतु या सर्वांसाठी भूलतज्ज्ञ चिपळूणहून बोलवावे लागतात.
– डॉ. संघमित्रा फुले
जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी.