कणकवली; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्ष संपवून हिंदूंची मते भाजपच्या बाजूने खेचण्यासाठी शिवसेनेत फूट पाडण्यात आली. मात्र शिवसेनेला संघर्षाचा वारसा आहे. संघर्षात शिवसेना अधिक पेटून उठते. येत्या निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरून नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. संघर्ष करणार्‍यांसोबत जनता कायम राहते. पक्ष आणि आपला नेता अडचणीत असताना त्यांच्या पाठीशी राहणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत आ. वैभव नाईक यांनी व्यक्त केले.

शिवसेना कणकवली तालुका कार्यकारिणीची बैठक मंगळवारी आ. वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली विजयभवन येथे पार पडली. यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीत शिवसेनेच्या कणकवली तालुका कार्यकारिणीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी कायम राहण्याचा ठराव घेतला. सतीश सावंत म्हणाले, शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे आणि त्यांनीच शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केली. त्यामुळे शिवसेनेवर कोणीही हक्क दाखवत असेल तरी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असतील तीच खरी शिवसेना कायम राहणार आहे. नारायण राणेंचा पराभव करून दोन वेळा निवडून आलेल्या आ. वैभव नाईक यांना मंत्रिपद मिळाले नसले तरी ते शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले आहेत, याचा शिवसैनिकांना अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पक्षाशी एकनिष्ठ असल्याची जास्तीत जास्त प्रतिज्ञापत्रे करण्याचे व सभासद नोंदणीचे आवाहन शिवसैनिकांना केले.

बैठकीला तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, शैलेश भोगले, सचिन सावंत, राजू राणे, संदेश पटेल, संजय आग्रे, कन्हैया पारकर, राजू रावराणे, बंडू ठाकूर, आबू पटेल, रुपेश आमडोसकर, प्रतीक्षा साटम, वैदही गुडेकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here