
राजापूर; पुढारी वृत्तसेवा : राजापूर शहरातील एस.टी. आगारासमोरील बंगालवाडी येथे गुरव समाजाचे महापुरुष देवस्थान असून, या ठिकणी भोठ्या प्रमाणावर भूस्खलन होत आहे. यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी बंगालवाडीतील रहिवासी व भाजपचे शहराध्यक्ष विवेक गुरव यांनी राजापूर तहसीलदार शीतल जाधव यांच्याकडे केली आहे.
याबाबतचे एक निवेदन गुरव यांनी तहसीलदारांना दिले आहे. या महापुरुष मंदिराच्या लगतची जागा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. या ठिकाणी या देवस्थाना शेजारी सुमारे 50 फूट खोदकाम करून सिमेंटची भिंत उभारण्यात आली आहे. ही भिंत उभारताना के. सी. सी. या ठेकेदार कंपनीने सिमेंट भिंत व देवस्थानाची जागा यामध्ये मोठी पोकळी ठेवल्यामुळे देवस्थानाजवळील जमिनीचे भूस्खलन होऊन हानी होऊ लागली आहे. यामुळे या देवस्थान इमारतीला धोका निर्माण झाला आहे. या बाबत गांभीर्यान लक्ष द्यावे आणि तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी गुरव यांनी तहसीलदार जाधव यांच्याकडे केली आहे.