
राजापूर; पुढारी वृत्तसेवा : राहत्या घराच्या असेसमेंटवरील आजोबांचे नाव बदलून तेथे वडिलांचे नाव लावण्यासाठी ३ हजारांची लाच घेताना ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडण्यात आले. राजापूर तालुक्यातील परुळे गावचे ग्रामसेवक संजय बबन दळवी (वय ४१) अशी अटक केलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. ही कारवाई रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (दि.२६) पाचल येथे केली. या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार तालुक्यातील परुळे गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या राहत्या घराचा असेसमेंट उतारा आजोबांच्या नावावर होता. तो तक्रारदार यांना आपल्या वडिलांच्या नावावर करायचा होता. याबाबत तक्रारदार यांनी ग्रामसेवक संजय दळवी यांच्याकडे विनंती केली होती. मात्र, ग्रामसेवक दळवी यांनी ३ हजारांची लाच मागितली होती. दरम्यान, तक्रारदार यांनी याची माहिती रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.
पोलीस निरीक्षक प्रवीण ताटे, पोलीस हवालदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, शिपाई हेमंत पवार, राजेश गावकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. ठरल्याप्रमाणे बुधवारी तक्रारदार यांच्या पाचल बाजारपेठेतील कार्यालयात जाऊन ग्रामसेवक दळवी यांनी ३ हजारांची रक्कम स्वीकारली. त्यानंतर ते पाचलमधील नारकरवाडीतील घरी गेले होते. त्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी दळवी यांच्या घरी जावून पंचासमक्ष त्यांना पैशासह रंगेहाथ पकडले.
गेल्या काही वर्षात तालुक्यात लाचलुचपत विभागाने महसूल, शिक्षण, कृषी, ग्रामीण पाणीपुरवठा आदी विभागात लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांना रंगेहात पकडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये राजापूरचे तत्कालीन तहसीलदार देखील पकडले गेले होते. या व्यतिरीक्त अन्य बड्या मंडळींचा देखील समावेश होता. त्यानंतर आता ग्रामसेवकावर लाचलुचपत विभागाने कारवाई केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचलंत का ?