
देवगड; सूरज कोयंडे : देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्या. उदय उमेश लळीत हे ऑगस्ट महिन्यात पदभार स्वीकारणार आहेत. न्या. लळीत हे देवगड तालुक्यातील गिर्ये गावचे सुपुत्र असून, सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती होणारे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले सुपुत्र ठरणार आहेत. त्यांच्या या निवडीमुळे ‘बुद्धिवंतांचा जिल्हा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाणार आहे.
न्या. उदय लळीत यांचे मूळ गाव विजयदुर्ग-गिर्ये आहे. सध्या त्यांचे कुटुंब रायगड जिल्ह्यातील आपटे (रोहा) येथे स्थायिक आहे. या गावात त्यांची कुलदेवता नृसिंहलक्ष्मी देवतेचे मंदिर असून, सुमारे 10 लळीत कुटुंबे या गावात वास्तव्यास आहेत.
न्या. लळीत यांना वकिली व्यवसायाचा पिढीजात वारसा आहे. त्यांचे आजोबा स्व. अॅड. धोंडदेव बाळकृष्ण लळीत हे पेशाने वकील होते व ते सोलापूर येथे स्थायिक झाले झाले होते. तर त्यांचे वडील अॅड. उमेश लळीत हे मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील होते. सन 1974 ते 76 या काळात त्यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते.
न्या. उदय लळीत यांचा जन्म मुंबई-आंग्रेवाडी येथे झाला. चिकित्सक समूहाच्या शिरोडकर हायस्कूलमधून त्यांनी मराठी माध्यमातून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथम मुंबईतील ज्येष्ठ वकील कै. एम. ए. राणे यांच्याकडे काही वर्षे सहायक म्हणून काम केले. नंतर ते दिल्लीत गेले व तब्बल सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ सोली सोराबजी यांचे सहकारी म्हणून काम केले. अनेक वर्षे ते सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली करत होते. 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ज्येष्ठ वकील म्हणून नामनिर्देशित केले. त्यांनी देशभर असंख्य महत्त्वाच्या खटल्यांमध्ये आपल्या वकिली कौशल्याचा ठसा उमटविला होता. देशभरातील बहुतांश राज्यांच्या उच्च न्यायालयांमध्ये त्यांनी अभ्यासपूर्ण युक्तिवाद केले.
गेली सात वर्षे ते सर्वोच्च न्यायालयात पॅनेलवरील ज्येष्ठ वकील होते. आजवर त्यांनी देशभरातील सुमारे 14 राज्य शासनांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे लढवली आहेत. देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा 2-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा खटला त्यांनी चालवला. ते एक नामवंत अभ्यासू न्यायमूर्ती म्हणून सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असून, विद्यमान सरन्यायाधीश रमणा यांच्या सेवानिवृत्तीनंतर नवे सरन्यायाधीश म्हणून केंद्र शासनाने त्यांची निवड जाहीर केली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात ते देशाचे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून न्या. यू. यू. लळीत यांची नियुक्ती झाल्याची बातमी जाहीर होताच त्यांचे पितृगाव असलेल्या गिर्ये गावात आनंद व्यक्त करण्यात आला.
- न्या. लळीत यांना वकिली व्यवसायाचा पिढीजात वारसा
- सात वर्षे ते सर्वोच्च न्यायालयात पॅनेलवरील ज्येष्ठ वकील
- देशभरातील सुमारे 14 राज्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात खटले लढले
- इतिहासातील सर्वात मोठा 2-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा खटला चालवला
- येत्या 27 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारणार
स्पेक्ट्रम घोटाळा चौकशीसाठी विशेष सरकारी प्रॉसिक्युटर
सुमारे 1.70 लाख कोटी रुपयांच्या 2-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित खटला चालविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या कलम 142 अन्वये विशेष अधिकार वापरून तत्कालीन ज्येष्ठ वकील उदय उमेश लळीत यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली होती. माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांच्यासह अनेक बड्या आसामी या खटल्यात आरोपी होत्या.