रत्नागिरी; भालचंद्र नाचणकर : राज्यातील सत्तांतरामुळे दापोली विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना कलाटणी मिळाली आहे. याच्या परिणामांना माजी मंत्री रामदास कदम आणि आ. योगेश कदम यांच्या विरोधकांना सामोरे जावे लागणार आहे. खेड नगर परिषदेच्या इंधन खर्चातील अपहार आणि समाजकल्याणचा खर्च चुकीच्या पद्धतीने करणार्‍यांवर गुन्हे दाखल होण्यासाठी माजी मंत्री रामदास कदम आणि आ. योगेश कदम आग्रही होण्याची शक्यता आहे.

खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याकडून लाखो रूपयांच्या इंधन खर्चाच्या बाबतीत आरोप करण्यात आले. त्याचबरोबर समाजकल्याण अंतर्गत लाखो रूपये खर्चाचा पूल बांधण्यात आल्याचे दाखवण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात काम वेगळेच झाले. याप्रकरणी खेड नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई झाली. माजी मंत्री रामदास कदम यांनी याप्रकरणी पुढाकार घेतला होता. समाजकल्याणचा निधी त्याच लेखाशीर्षाखाली न वापरता रस्त्याच्या कामाला वापरण्यात आल्याचेही उघडकीस आले. शासनाच्या निधीच्या अपहारप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. परंतु, महाविकास आघाडी सरकारच्या राजाश्रयामुळे ही कारवाई रखडली होती. आता मात्र सत्तांतरामुळे ही कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

महाविकास आघाडीतील परिवहनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना राजकीय संरक्षण होते. याच राजकीय परिस्थितीमुळे माजी मंत्री रामदास कदम यांचे आमदारपुत्र योगेश कदम यांची राजकीय कोंडी केली जात होती. आता माजी मंत्री रामदास कदम आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेप्रणित शिवसेनेचे उपनेते आहेत. त्यामुळे खेडचे माजी नगराध्यक्ष खेडेकर यांच्यावर निधी गैरवापर प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी अधिक जोमाने प्रयत्न होणार आहेत.

माजी मंत्री रामदास कदम आणि मनसेचे नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर शिवसेनेत होते. त्यावेळी खेडेकर यांच्या राजकीय कारकिर्दीला माजी मंत्री कदम यांनी आकार दिला. आता महाविकास आघाडी सरकार जाऊन तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेप्रणित शिवसेनेची सत्ता आली असून, या गटाचे माजी मंत्री रामदास कदम उपनेते आहेत. त्यामुळे फौजदारी कारवाईचा वेग वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here