
रत्नागिरी; जान्हवी पाटील : एका मातेला दोन जुळी मुले झाली. एक मुलगा आणि मुलगीला संबंधित मातेने जिल्हा शासकीय रुग्णालयात जन्म दिला. जन्मत:च या दोन्ही नवजात बालकांच्या डोळ्यांना मोठी समस्या असल्याचे समजले. उपचार केले नाही, तर अंधत्व येणार होते. त्यामुळे संबंधित पालकांनी मुलाला कोल्हापूरला नेऊन इंजेक्शन दिले. पण, चिमुकलीसाठी इंजेक्शन देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून दिले नाही. ही बाब जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना समजताच त्यांनी तिच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आणि या घटनेतील चिमुकलीला अखेर नवजीवन मिळाले.
जन्मदात्यांकडून मुलगा-मुलगी असा भेद पाहायला मिळालेल्या या घटनेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड आणि डॉ. संघमित्रा फुले यांनी या चिमुकलीला उपचार मिळेपर्यंत सहकार्य केले. रत्नागिरी जिल्ह्यात एकिकडे मुलगी जन्माचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात असताना मात्र या घटनेत दुजाभाव झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या पालकांचे समुपदेशन करून भविष्यात पुन्हा असा प्रकार घडू नये, यासाठी समज देण्यात आली आहे. नुकतीच जिल्हा शासकीय रुग्णालयात संबंधित मातेची प्रसूती झाली. शासकीय रुग्णालयातील नवजात शिशू विभागात बाळ जन्माला आल्यानंतर 24 तासांच्या आत कान, नाक, डोळे तपासले जाते. त्यानंतरच डिस्चार्ज दिला जातो. ही तपासणी केली असता संबंधित जुळ्या मुलगा आणि मुलगीच्या डोळ्यांच्या पडद्याची समस्या असल्याचे बालरोग तज्ज्ञांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी अधिक उपचाराचा सल्ला दिला. नवजात बालकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन सिव्हिलमध्येच करण्यात येणार होते. मात्र, यासाठी जे इंजेक्शन लागणार होते ते इंजेक्शन काही ठराविक आय हॉस्पिटलमध्येच उपलब्ध असल्याने पालकांनी मुलाला कोल्हापूरला नेले तर मुलीला नेले नाही. एकासाठी 40 हजार रुपयांचे हे इंजेक्शन आहे.
या घटनेतील जुळ्या मुलांपैकी मुलाला इंजेक्शन देऊन आणण्यात देखील आले. ही बाब जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब जिल्हा शल्यचिकित्सक यांना विचारले असता हा प्रकार समोर आला. दानशूर लोकांच्या मदतीने सिव्हीलमध्ये या मुलीला इंजेक्शन आणून देणार होते. मात्र, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घातले. याचवेळी खेड तालुक्यातील प्रशांत पटवर्धन हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांनी या चिमुकलीच्या इंजेक्शनच्या खर्चासाठी आर्थिक मदत केली. हे इंजेक्शन त्वरित घेण्यात आले. प्रशासनातील हे 3 अधिकारी आणि प्रशांत पटवर्धन यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे चिमुकलीला नवसंजीवनी मिळाली आहे.
The post रत्नागिरी : जन्मदात्यांनी अव्हेरले… अधिकार्यांनी तारले! appeared first on पुढारी.