देवरुख; पुढारी वृत्तसेवा :  नजीकच्या साडवली येथील कातळावर ‘दीपकाडी’ या वनस्पतीचे मोठ्या प्रमाणात रान उगवले आहे.अशी वनस्पती रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आहे. याचे संवर्धन करण्यासाठी मातृमंदिर संस्थेने पुढाकार घेतला असून या दीपकाडीचा महोत्सव 5 रोजी आयोजित केला असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी दिली.

असा हा महोत्सव कोकणात प्रथमच होत आहे. महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. बी एन. पाटील यांच्या हस्ते सकाळी 10.30 वा. होणार आहे. यावेळी पर्यावरणप्रेमी, कातळावरील वनस्पती व फुलांचे अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. कोकणात जैवविविधता पाहावयास मिळतात. यातीलच एक दीपकाडी ही वनस्पती फुल देणारी आहे. या वनस्पतीचा शोध सुमारे 1700 सालात लागला आहे. स्पेनच्या वनस्पती अभ्यासाकडे याचा शोध लावला. या वनस्पतीला पांढरे फुल येते. हे लीली या फुलासारखे दिसते. कातळावर प्रतिवर्षी पावसात वनस्पती उगवते त्याला श्रावण मासाच्या सुमारास फुलधारणा होते.

ही वनस्पती संपूर्ण माळच्या माळ हिरवा व पांढर्‍या रंगाने सजवते. ही दुर्मीळ मानली जाणारी वनस्पती प्रकाशझोतात आणण्याबरोबर तीचे संवर्धन झाले पाहिजे. यासाठीच मातृमंदिर संस्थेने पुढाकार घेतला. साडवली येथील इंदिराबाई बेहरे औद्योगिक केंद्राचा परिसर सध्या दीपकाडीने बहरला आहे. याच केंद्रात हा महोत्सव भरवला जाणार आहे. एक दिवसाचा महोत्सव असून प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी वर्गाला या महोत्सवातून दीपकाडीची माहिती दिली जाणार आहे. ‘स्लाईड शो’ द्वारे माहिती दिली जाणार असून प्रत्यक्षात पहाणी करण्याची संधी मातृमंदिर उपलब्ध करून देणार आहे.

या दीपकाडीला स्थानिक नाव गौरीची फुले असे आहे. दिवसभर या महोत्सवातून या कातळावरील आणखीनही असलेली वनस्पती त्यांच्यावर येणारे कीटक यांचीही माहिती देण्याबरोबर प्रत्यक्षात ते दाखवले जाणार आहे. याचसाठी मातृमंदिरने पहिले पाऊल टाकले आहे. भविष्यात याचे महोत्सव अनेक दिवसांचे करण्याचा संस्थेचा मानस आहे. येथील कातळावरील ही दुर्मीळ जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी सामुहिक प्रयत्न गरजेचा आहे.  या एक दिवसीय महोत्सवाचा लाभ येथील नागरिक व पर्यावरणप्रेमी व याचे संवर्धनाची धुरा भविष्यात घेणारे विद्यार्थी यांनी घेण्याचे आवाहन श्री. हेगशेट्ये यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here