रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मालगुंड येथील ग्रामदेवता असलेल्या श्री चंडिका मंदिरानजीकच्या गायवाडी तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास उघडकीस आली. वैभव दत्ताराम वाळवे (32, रा. मालगुंड भाटलेवाडी, रत्नागिरी)असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

वैभव मंगळवारी आपली गुरे घेऊन गायवाडी परिसरात गेला होता. त्या ठिकाणी गुरे चारत असताना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तो गायवाडी तलावात अंघोळीसाठी उतरला. दुपारी 2.30 च्या सुमारास तो बुडून गायवाडी तलावात तरंगत असल्याचे तलावाच्या नजीकच असलेल्या चायनीज सेंटरचे मालक दत्ताराम आग्रे यांना आढळले. त्यांनी याबाबत आजूबाजूच्या ग्रामस्थांना सांगितले. ग्रामस्थ त्या ठिकाणी जमा झाल्यावर संबंधित तरुण मालगुंड भाटलेवाडी येथील असल्याचे समजताच त्यांनी त्याच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. दरम्यान, वैभवला मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. त्याच्या मृतदेहाचा पंचनामा जयगड पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असलेल्या मालगुंड – गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल जाधव व पोलीस कॉन्स्टेबल सागर गिरीगोसावी करत आहेत. वैभव वाळवेच्या पश्चात आई व मोठी बहीण असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here