खेड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात दि.31 जुलै 2021 च्या तुलनेने दि.31 जुलै 2022 पर्यंत सुमारे एक हजार मिलीमीटर पावसाची कमी नोंद झाली असून परिणामी धरणांमध्ये जास्तीत जास्त साठ टक्के एवढाच पाणी साठा झाल्याने चिंता वाढली आहे. आगामी कालावधीत पावसाची सरासरी गतवर्षी एवढी देखील नोंद गाठण्याची शक्यता धूसर होत असल्याने दृष्काळाचे सावट अधिक गडद होत आहे.

खेड तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पर्जन्यमान कमी होत आहे. परिणामी पाणी टंचाईच्या झळा अधिकाधिक तीव्र होत असताना यावर्षीदेखील पर्जन्यमान कमी झाल्याने चिंता वाढली आहे. दि.1 जून ते दि.31 जुलै 2021 या कालावधीत खेड तालुक्यात सरासरी 2654 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली होती. तर यावर्षी याच कालावधीत केवळ 1550 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे.

तालुक्यातील सर्वच भागात पर्जन्यमान कमी असल्याने धरणामध्ये पाणीसाठा कमी होताना दिसत आहे. नातूवाडी धरणामध्ये दि.31 जुलै रोजी 18.377 दशलक्ष घनमिटर एवढा पाणीसाठा आहे. शिरवली धरणात 2.979 दलघमी, सोंडेघर धरणात 2.211 दलघमी, पिंपळवाडी धरणात 17.947 दलघमी, शेलारवाडी धरणात 5.662 दलघमी एवढा पाणीसाठा झाला असून, धरणक्षेत्रात पावसाची नोंद सरासरी दोन हजार मिलीमीटरपेक्षा अधिक झाली असली तरी धरणामध्ये पाणीसाठा साठ टक्क्यांपेक्षा अधिक झाला नसल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे.

कोकण हा प्रांत अतिपर्जन्यवृष्टीसाठी ओळखला जातो. परंतु गेल्या तीन वर्षापासून कोकणात सातत्याने पावसाचे प्रमाण घटत असल्याचे चित्र प्राप्त आकडेवारीवरून दिसून येत आहे. दि.1 जून 2020 ते 22 ऑगस्ट 2020 या कालावधीत खेडमध्ये 4074 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर दि.1 जून ते 2021 ते दि.22 ऑगस्ट 2021 या कालावधीत खेडमध्ये 3367.80 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी पावसाने ऑगस्ट महिना सुरू झाला तरी दोन हजारांची सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत तालुक्यात पावसाचा टक्का घसरताना दिसत आहे. यावर्षी अशीच परिस्थिती कायम राहिल्यास धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांना पाण्याचा वापर निश्चितच जपून करावा लागेल. पर्जन्यमान घटल्यामुळे उन्हाळ्यात तालुक्याच्या काही भागात करण्यात येणार्‍या उन्हाळी शेतीवर देखील याचा परिणाम होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here