कणकवली; पुढारी वृत्तसेवा :  कणकवली तहसीलदार रमेश पवार यांच्या पुढाकाराने नुकतेच लोक सहभागातून तहसीलदार कार्यालयाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. आता त्यांच्याच संकल्पनेतून आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात 75 फुटी तिरंगा झेंडा फडकवला जाणार आहे. तसेच तहसीलदार कार्यालयामार्फत सर्व संस्थांच्या सहभागातून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

कणकवली तहसीलदार कार्यालयाची नूतन इमारत काही वर्षांपूर्वी बांधण्यात आली. मात्र, तहसील कार्यालयाचे प्रांगण आवश्यक त्या प्रमाणात नव्हते. काही जुनी बांधकामे, झाडे आणि कंपाऊंडचे कठडे होते. तहसीलदार रमेश पवार यांनी आपले नियमित कामकाज चोख बजावताना गतवर्षी लोकसहभागातून या कार्यालयाभोवती कंपाऊंड वॉल बांधली होती. तर यावर्षी तहसिल कार्यालयाच्या प्रांगणाचे सुशोभीकरण करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून तहसीलदार रमेश पवार यांनी स्वतः उभे राहून लोकसहभागातून हे काम करुन घेतले. त्यामुळे तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे.

आता आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मध्यबिंदूला 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत 75 फुटी तिरंगा झेंडा फडकवला जाणार आहे. त्याचा शुभारंभ 13 ऑगस्टला सकाळी 11 वा. केला जाणार आहे. यासाठी कणकवली शहरातील सर्व संस्थांचा सहभाग असणार आहे. हा तिरंगा सकाळी फडकवला जाणार आहे आणि सायंकाळी उतरवला जाणार आहे. त्यामुळे या तिरंग्या झेंड्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here