मासेमारी

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात वेगवान वारा आणि मुसळधार पावसामुळे समुद्र खवळला असून, मासेमारीत विघ्न आले आहे. हंगामाच्या आरंभीला मच्छीमारांना फटका बसला आहे. पाण्याला प्रचंड ‘करंट’ असल्यामुळे जाळी मारणेही अशक्य झाले आहे. नौका पाण्यात उभ्या करणे शक्य नाही. त्यामुळे मच्छीमारांनी सुरक्षेसाठी नौकांसह भगवती, जयगड बंदरात आसरा घेतला आहे.

शासनाच्या निर्देशानुसार जून, जुलै या दोन महिन्यांत मासेमारीला बंदी केली जाते. दि. 1 ऑगस्टला बंदी कालावधी संपुष्टात आल्यानंतर जिल्ह्यातील 20 टक्के मच्छीमार समुद्रावर स्वार झाले. समुद्रही शांत असल्याने हे वातावरण मासेमारीला पूरक होते. त्यामुळे ट्रॉलिंगवाल्यांच्या नौका खोल समुद्राकडे जाऊ लागल्या. दि. 1 रोजी गेलेल्या नौका दोन दिवसांनी हर्णै बंदरात आल्या तर त्या नंतर पुन्हा मासेमारीला रवाना झालेल्या नौकांना मात्र वारा, पावसाने गाठले. खोल समुद्रातील वातावरण बिघडल्यामुळे सुरक्षिततेसाठी नौकांनी जयगड, भगवतीसह जवळील बंदरात नांगर टाकला आहे.

दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. वार्‍यामुळे समुद्रात लाटा उसळल्या असून या परिस्थितीत जाळ्यांचे रोप तुटण्याची भीती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये मच्छीमार नौका बंदरात उभ्या करणे पसंत करीत आहेत. जिल्ह्यात ट्रॉलिंग, गिलनेटसह पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार्‍या 3 हजाराहून अधिक नौका आहेत. त्यासाठी सहाशेहून अधिक नौकांनी मासेमारीला सुरवात केली. श्रावण महिन्यात धार्मिक सप्ताह असल्याने काहींनी शुक्रवारचा मुहूर्त साधला होता. पण वातावरण बिघडल्यामुळे त्यांना मुहूर्त पुढे ढकलावा लागला आहे. काही नौका नारळी पौर्णिमेनंतरच रवाना होणार आहेत. हवामान विभागाकडून चार दिवसांचा अलर्ट दिला आहे. खराब वातावरणाचा फटका मच्छीमारांना पहिल्या आठवड्यात बसला आहे. सुरुवातीला गिलनेटला बांगडा, ट्रॉलिंगला चिंगळं आणि म्हाकुळ मासा मिळत असल्याने मच्छीमार खुशीत होते. मात्र पावसामुळे मच्छीमारांच्या आनंदावर पाणी फिरले आहे.

The post पाऊस, वार्‍यामुळे मासेमारीला ‘ब्रेक’! appeared first on पुढारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here