रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेप्रणित शिवसेनेत सामील झाल्याने रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणूक संदर्भातील वातावरण शांत झाले आहे. नगरसेवक पदासाठी शिवसेनेची उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेनेंतर्गत इच्छुकांची धावपळ सुरू होती. गेल्या महिन्याभरापासून हे वातावरण शांत झाले आहे.

शिवसेनेच्या पक्षपातळीवर महिनाभरापूर्वी गटातटाचे राजकारण होऊन सत्तांतर झाले. या घडामोडी होण्यापूर्वी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत मूळ शिवसेनेत होते. त्यावेळी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रमही सुरू झाला होता. प्रभाग रचना झाली होती. इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण वगळून आरक्षण प्रक्रिया पार पडली होती. त्यामुळे आता निवडणुका होणार अशी आशा होती. वरिष्ठ पातळीवरच्या शिवसेनेअंतर्गत कोणतीही दुही नव्हती. एकच धनुष्यबाण हीच निशाणी होती. त्यात रत्नागिरी शहरात शिवसेनेचे वर्चस्व असल्याने इच्छुकांची उमेदवारी मिळण्यासाठी रस्सीखेच सुरू होती.

शिवसेना एकच असताना धनुष्यबाण निशाणीबाबत कोणताही वाद नव्हता. त्यामुळे धनुष्यबाण निशाणीवर निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार शिवसेना नेत्यांशी संपर्क साधत होते. अचानक महिन्याभरापूर्वी शिवसेनेचे दोन गट झाले आणि धनुष्यबाण निशाणी कुठल्या गटाला मिळणार? हा प्रश्न निर्माण झाला. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मात्र या घडामोडींमुळे रत्नागिरीतील शिवसेनेमध्ये निवडणूकपूर्व वातावरण निर्माण झाले होते ते शांत झाले आहे. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेल्यानंतर निवडणूक वातावरणाला आणखी कलाटणी मिळाली. शिवसेनेच्या नेतृत्वासंदर्भातील वादानंतर ज्यांना आमदार उदय सामंत गटातून उमेदवारी मिळणार नाही याची ज्यांना खात्री पटली ते मुळ शिवसेना गटात गेले. त्यात आता धनुष्यबाण निशाणीची गडबड असल्याने राजकीय वातावरण थंडावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here