खेड; अनुज जोशी : रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात रविवार (दि. ७) रोजी दरड कोसळली. या दुर्गघटनेमुळे या मार्गावरील वाहतुक सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे कांदाटी खोऱ्यातील सुमारे २१ गावांचा खेड तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे.

पावसाळा सुरू झाल्या पासून गेल्या दोन महिन्यात रघुवीर घाटात दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. वारंवार दरड कोसळू लागली असल्याने कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय होऊ लागली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्यात शिंदी, वाळवण, आकल्पे यासारखी सुमारे २१ गावे आहेत. महाबळेश्वर आणि कांदाटी खोरे यामध्ये कोयना धरणाच्या बॅकवॉटरमुळे येथील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जायचे झाल्यास होडीतून जावे लागते. पावसाळ्यात होडीतून जाणे देखील शक्य होत नसल्याने पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना रघुवीर घाट मार्गे खेड व तेथून पोलादपूर मार्गे महाबळेश्वर येथे जावे लागते. या गावांचा त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून प्रवास होत असतो. ग्रामस्थ शासकीय काम वगळता अन्य दैनंदिन कामासाठी महाबळेश्वरला जाण्याऐवजी खेड तालुक्यात येणे पसंत करतात. त्यामुळे रघुवीर घाट कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थांसाठी जगाशी संपर्क ठेवण्यासाठी महत्वाचा आहे.

खेड एसटी आगाराची खेड-आकल्पे ही बस प्रवाशांची ने-आण करत असते. तर मुंबईहून या खोऱ्यात येणाऱ्या एसटीच्या बसेस देखील रघुवीर घाटातूनच कांदाटी खोऱ्यात जात असतात. कांदाटी खोऱ्यातील अनेक गावांना उपयुक्त असणारा रघुवीर घाटाचा काही भाग गतवर्षीच्या अतिवृष्टीत ढासळला होता. त्यामुळे या घाटातील वाहतूक बंद करावी लागली होती. पावसाळ्यात कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने ढासळलेल्या रघुवीर घाटाची डागडुजी करायला हवी होती मात्र बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने यावर्षी या खोऱ्यातील ग्रामस्थांना वारंवार दळणवळणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

काही दिवसांपूर्वी घाटात कोसळलेली दरड बाजूला करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला तब्बल ३६ तासांचा अवधी लागला होता. त्यामुळे कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थांना गावालगतच अडकून पडावे लागले होते. खेड येथून आकाल्पे येथे गेलेली खेड आगाराची एसटी बस देखील कांदाटी खोऱ्यातच अडकून पडली होती. ३६ तासानंतर घाट मोकळा झाल्यावर अडकून पडलेली आकल्पे खेड एसटी रविवार (दि. ७) रोजी सकाळी ९ वाजता घाट उतरून खेड आगारात परतली होती.

त्यानंतर पुन्हा एकदा घाटात दरड कोसळली आणि हा घाट वाहतुकीसाठी बंद झाला. घाट बंद झाल्याने या खोऱ्यातील सुमारे २१ गावांचा जगाशी असलेला संपर्क पुन्हा एकदा तुटला. दरड कोसळल्याची बातमी मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारांच्या मदतीने दरड काढण्याचे काम सुरु केले आहे. मात्र मुसळधार पाऊस असल्याने दरड बाजूला करण्यात अडथळे येत आहेत.

हेही वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here