
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात शुक्रवारपासून सतत कोसळणार्या पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे. दोन आठवडे पूर्णपणे विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. कोकणात गेले 24 तास मुसळधार पाऊस असून जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. गुहागर तालुक्यालाही तडाखा बसला असून, खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर वाहू लागली आहे. ही स्थिती लक्षात घेत पुढील 48 तासांसाठी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
गतवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तुरळक पाऊस झाला होता. यंदा मात्र 24 तासांत 750 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांत झाली आहे. जून ते आतापर्यंत एकूण सरासरी 2135.50 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. पुढील 48 तासात मुसळधार पाउस कामय राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. गेले तीन दिवस विश्रांती न घेता सातत्याने कोसळणार्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असले तरी बळीराजा चांगला सुखावला आहे. मुसळधार पावसामुळे रविवारी नागरिकांनी घरात राहणे पसंत केले, प्रशासनाने कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने खेड, राजापूर, लांजा व ग्रामीण भागातील नागरिकांना केले आहे.