
कणकवली; पुढारी वृत्तसेवा : तळेरे येथे चार दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून बिबट्याच्या कातडीची तस्करी करणार्या दोघांना अटक केली होती. पोलिस कोठडीतील त्या दोन संशयितांच्या चौकशीत याप्रकरणी आणखी चार संशयितांंना कणकवली पोलिसांच्या पथकाने रविवारी पहाटे ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून रविवारी सायंकाळी त्यांना अटक केली. अटक केलेल्या संशयितांमध्ये संतोष मधुकर मेस्त्री, श्रीराम सखाराम सावंत, आप्पा हरिश्चंद्र सावंत, मंगेश पांडुरंग सावंत यांचा समावेश आहे. त्यांना सोमवारी कणकवली न्यायालयात हजर केले जाणार आहे.
चौकशीतबिबट्याच्या कातडीचा व्यवहार हा कुंभवडे-गावठणवाडीतील श्रीराम सखाराम सावंत (28) याच्यामार्फत झाल्याचे उघड झाले. त्याच्यापर्यंत ते संशयित कसे पोहोचले याची चौकशी केली असता कुंभवडे-शाळेवाडीतील
संतोष मधुकर मेस्त्री (43) याचे नाव पुढे आले. संतोष मेस्त्री हा यातील संशयित आरोपी राजेंद्र पारकर (वळीवंडे) याच्या संपर्कात होता. संतोष मेस्त्री हा रामगड येथे हार्मोनियम पेटी बांधण्याचे काम करतो. पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकेशन तपासले असता तो कुंभवडे येथेच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रविवारी पहाटे 4.30 वा. पोलिसांनी त्याला घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर श्रीराम सावंतलाही ताब्यात घेतले. श्रीराम सावंतला बिबट्याची कातडी कुणी दिली? याची विचारणा केली असता आप्पा हरिश्चंद्र सावंत (38, भिरवंडे-परतकामवाडी) याने दिल्याचे त्याने सांगितले. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याच्यासोबत मंगेश पांडुरंग सावंत (54, भिरवंडे-परतकामवाडी) हाही असल्याचे सांगितले.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आप्पा सावंत, मंगेश सावंत या दोघांनी दोन वर्षांपूर्वी बिबट्याची शिकार केल्याचे समजले. तीन महिन्यांपूर्वी ते कातडे विक्रीसाठी श्रीराम सावंत याच्याकडे दिले होते. मात्र, ती शिकार कुठल्या जंगलात केली, त्यांच्यासोबत आणखी कोण होते? याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, वृषाली बरगे करीत आहेत.