देवगड; पुढारी वृत्तसेवा :  समुद्रात 7 ते 10 ऑगस्ट या कालावधीत ताशी 55 ते 75 कि. मी. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे गुजरात, मुंबईसह शेकडो मासेमारी नौका सुरक्षिततेच्यादृष्टीने देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. तसेच किनार्‍यावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश स्थितीमुळे देवगड बंदरात गुजरात येथील 56 नौका, मुंबई येथील 5 नौका व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक मासेमारी नौका सुरक्षिततेसाठी दाखल झाल्या आहेत.

देवगडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून ठिकठिकाणी नदीनाले तुडुंब भरून वाहत आहेत. मात्र, तालुक्यात कुठेही पडझड झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागात झाली नव्हती. देवगड तालुक्यात रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 175 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असल्याने किनार्‍यावरील नागरिकांनी सावधानता बाळगावी. तसेच मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here